akola politics | Sarkarnama

खासदार धोत्रे गटावर मुख्यमंत्र्यांचे प्रेम वाढले! 

श्रीकांत पाचकवडे 
रविवार, 13 ऑगस्ट 2017

अकोला शहरासह ग्रामीण भागात भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळत वऱ्हाडाच्या राजकारणात आपला दबदबा कायम करणारे भाजपचे खासदार संजय धोत्रे गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेम वाढल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. शासनाचे धोरणात्मक निर्णय, समित्या आणि निधी वितरणात धोत्रे गटाच्या आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांना झुकते माप देत पक्षातंर्गत राजकारणात दोन्ही गटांना सांभाळण्याची नवी खेळी मुख्यमंत्र्यांकडून खेळली जात आहे. 

अकोला : शहरासह ग्रामीण भागात भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळत वऱ्हाडाच्या राजकारणात आपला दबदबा कायम करणारे भाजपचे खासदार संजय धोत्रे गटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेम वाढल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. शासनाचे धोरणात्मक निर्णय, समित्या आणि निधी वितरणात धोत्रे गटाच्या आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांना झुकते माप देत पक्षातंर्गत राजकारणात दोन्ही गटांना सांभाळण्याची नवी खेळी मुख्यमंत्र्यांकडून खेळली जात आहे. 

अकोला जिल्ह्याच्या राजकारणात खासदार संजय धोत्रे आणि गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात पक्षातंर्गत सुरू असलेली वर्चस्वाची लढाई सर्वश्रुत आहे. पक्षाच्या सभा असो की शासकीय कार्यक्रम, बैठकांमध्ये एकमेकांचे उणे-दुणे काढण्याची एकही संधी दोन्ही गटाचे नेते कधीही सोडत नाहीत. त्यामुळे पक्षातंर्गत वाढलेले कुरघोडीचे राजकारण थांबवित दोन्ही गटांना सांभाळण्याची खेळी मुख्यमंत्र्यांकडून खेळली जात आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने राज्य शासनाच्या कारभारात डॉ. रणजित पाटील यांची चलती असल्याचे बोलले जाते. मात्र, दुसरीकडे वऱ्हाडाच्या राजकारणात पक्षसंघटनेवर मजबुत पकड असलेल्या खासदार संजय धोत्रे गटाशी मुख्यमंत्र्यांनी कधीही दुरावा ठेवला नाही. खासदार संजय धोत्रे गटाचे आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांना वेळोवेळी योग्य सन्मान देऊन त्यांनी सुचविलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकपणे मंजुरी देत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर केला. 

आमदार रणधीर सावरकर हे अभ्यासू आमदार आहेत, अशी प्रशंसा मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच जाहीर कार्यक्रमांमध्ये करतात. त्यामुळेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी तयार केलेल्या हवामान अनुकल प्रकल्पाच्या महत्वपूर्ण समितीवर आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पुढाकारासाठी झालेल्या महत्वपूर्ण आढावा बैठकीत कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ रणधीर सावरकर या एकमेव आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सहभागी करून घेतले. विकास निधी वितरणातही आमदार शर्मा, आमदार सावरकरांनी सुचविलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देत कोट्यवधी रुपयांचा निधी देत धोत्रे गटाला झुकते माप मुख्यमंत्री देत आहेत, हे विशेष. 

संबंधित लेख