akola politics | Sarkarnama

देवेंद्रभाऊ, मी कर्जमुक्त होणारच! 

श्रीकांत पाचकवडे 
सोमवार, 22 मे 2017

प्रिय देवेंद्रभाऊ, विरोधी पक्षात असताना शेतकरी कर्जमुक्तीसाठी तुमची अनेक भाषणे ऐकली. आत्महत्येच्या गर्तेत सापडलेल्या आमच्या शेतकरी बांधवांना नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसविले. मात्र, सत्तेवर बसताच तुमचे सरकार सातत्याने आमच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. आता बसं झालं "मी कर्ज मुक्त होणारच' अशी कॅच लाइन वापरत शिवसेनेकडून राज्यभर सत्ताधारी भाजपविरोधात राण पेटविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे 30 हजारांवर शेतकऱ्यांकडून बारा प्रश्नांची उत्तरे लिहून घेत सरकारला निरुत्तर करीत कर्जमुक्तीसाठी शासनावर दबाव टाकण्यात येत आहे. 

अकोला : प्रिय देवेंद्रभाऊ, विरोधी पक्षात असताना शेतकरी कर्जमुक्तीसाठी तुमची अनेक भाषणे ऐकली. आत्महत्येच्या गर्तेत सापडलेल्या आमच्या शेतकरी बांधवांना नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसविले. मात्र, सत्तेवर बसताच तुमचे सरकार सातत्याने आमच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. आता बसं झालं "मी कर्ज मुक्त होणारच' अशी कॅच लाइन वापरत शिवसेनेकडून राज्यभर सत्ताधारी भाजपविरोधात राण पेटविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे 30 हजारांवर शेतकऱ्यांकडून बारा प्रश्नांची उत्तरे लिहून घेत सरकारला निरुत्तर करीत कर्जमुक्तीसाठी शासनावर दबाव टाकण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून मित्र पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याची खेळी शिवसेनेकडून खेळल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यावर सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे झालेल्या शेतकरी अधिवेशनात "मी कर्जमुक्त होणारच' असा नारा शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची गोची झाली आहे. शिवसेनेकडून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे 30 हजारांवर शेतकऱ्यांकडून "मी कर्ज मुक्त होणारच' अशी कॅच लाइन असलेल्या बारा प्रश्नांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेल्या या अर्जात भाजप सरकारचा नोटबंदीचा निर्णय, पीक विमा योजना, शेततळे, मुख्यमंत्र्यांची मागेल त्याला शेततळ्याची घोषणा, शेतमालास हमीभाव, कर्जवसुलीच्या दबावामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो का? अशा विविध ज्वलंत मुद्यांकडे लक्ष वेधत भाजप सरकार निरुपयोगी ठरल्याची चीड मनात खदखदत आहे का? असे प्रश्न शेतकऱ्यांकडून भरून घेत भाजप सरकारविरोधी रान पेटविण्यात येत आहे. राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी देण्यात आली असून वऱ्हाडात त्याला सुरवात सुद्धा झाली आहे. 

उद्धवसाहेब विचारतील जाब 
नितीन देशमुख (जिल्हाप्रमुख शिवसेना, अकोला) : शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्याची जबाबदारी विधानसभा मतदारसंघनिहाय शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. हे अर्ज भरून झाल्यावर पक्षाकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आहेत. 
 

आता शांत बसणार नाही 
गोपीकिशन बाजोरिया (आमदार शिवसेना, अकोला) : भाजप सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत असून शेतकऱ्यांवरील अन्याय शिवसेना कधीही खपवून घेणार नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी पुकारलेला एल्गार लक्षात घेता आम्ही आता शेतकरी कर्ज मुक्त होईपर्यंत शांत बसणार नाही.

संबंधित लेख