Akola politics | Sarkarnama

सरकारमधले `जलदरोडेखोर' शोधणार : ठाकरे 

श्रीकांत पाचकवडे 
सोमवार, 15 मे 2017

राज्यातील अनेक जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून, ही गंभीर बाब आहे. पूर्वीचा सिंचन घोटाळा आणि सध्याचा जलयुक्त शिवारचा घोटाळा यात काहीच फरक नाही. शिवसेना राज्य सरकारमधील जलदरोडेखोरांना शोधून काढून त्यांना शासन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. 

अकोला : राज्यातील अनेक जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असून, ही गंभीर बाब आहे. पूर्वीचा सिंचन घोटाळा आणि सध्याचा जलयुक्त शिवारचा घोटाळा यात काहीच फरक नाही. शिवसेना राज्य सरकारमधील जलदरोडेखोरांना शोधून काढून त्यांना शासन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. 

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार (ता.15) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पश्‍चिम विदर्भ संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार प्रतापराव जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ``राज्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था झाली असताना राज्य शासनाकडून निव्वळ घोषणाबाजी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.19) नाशिक येथे शेतकऱ्यांचा भव्य मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात शेतकऱ्यांना बोलण्यासाठी शिवसेना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी शिवसेनेने नेहमीच आक्रमकपणे लढा दिला आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो तरी शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडत आहोत. सत्ताधाऱ्यावर व सत्तेवर अंकुश ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही बोलत आहोत. शेतकऱ्यांना संकटातून सावरायचे असेल तर कर्जमुक्ती झालीच पाहिजे आणि कर्जमुक्ती केल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही.'' 

राज्यात मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. मात्र, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात झालेला सिंचन घोटाळा आणि आता झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या घोटाळ्यात काहीच फरक नाही. कोकणामध्येही या अभियानात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. जलयुक्त शिवार अभियानात घोटाळे करणारे सरकारमधले जलदरोडेखोर कोण आहेत? ते आम्ही बाहेर काढणार आहोत. या अभियानाची राज्यभर चौकशी करून जलदोडेखोरांना शासन दिल्याशिवाय शिवसेना शांत राहणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. 

विदर्भाला न्याय देऊन दाखवीन 
विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. शिवसेनेची राज्यात सत्ता आल्यावर विदर्भाला निश्‍चितच न्याय देणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास विदर्भातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांशी संवाद करा; शिवीगाळ नको 
भाजपकडून शेतकऱ्यांशी संवाद यात्रा काढण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी खासदार रावसाहेब दानवेंचे नाव न घेता चिमटा काढला. शेतकऱ्यांशी संवाद करा, फक्त त्या संवादात शिवीगाळ नसावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित लेख