akola politics | Sarkarnama

कर्जमुक्तीशिवाय शिवसेना शांत बसणार नाही : खा. सावंत 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

शेतकऱ्यांवरील अन्याय शिवसेना कदापी खपवून घेणार नसून संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी दिला. 

अकोला : निवडणुकांमध्ये जनतेला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर बसलेले राज्यातील भाजप सरकार निव्वळ शेतकरी हिताच्या गप्पाच करण्यात दंग आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे सत्र अद्यापही थांबले नसून शेतकरी चिंतातूर झाला असताना यांची "मन की बात' सुरू आहे. आम्ही केंद्र व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शेतकरी हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमक ठेवतो. शेतकऱ्यांवरील अन्याय शिवसेना कदापी खपवून घेणार नसून संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी दिला. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शुक्रवारी शिवसेनेकडून रूमने मोर्चा काढण्यात आला. या वेळी खासदार सावंत यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व पदाधिकाऱ्यांनी बैलबंडीत बसून मोर्चाचे नेतृत्व केले. या आंदोलनापूर्वी झालेल्या जाहीर सभेत खासदार सावंत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे, सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख ज्योत्स्ना चोरे, बाजार समितीचे सभापती सेवकराम ताथोड, उपजिल्हा प्रमुख बंडूभाऊ ढोरे, प्रदीप गुरूखुद्दे, रवींद्र पोहरे, महापालिका शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, महानगराध्यक्ष अतुल पवनीकर, तरुण बगेरे, मंगेश काळे, सागर भारूका यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी खासदार सावंत म्हणाले की, निसर्गाची अवकृपा, डोक्‍यावर बॅंक, सावकारांच्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. काबाडकष्ट करून पिकविलेल्या तुरीला योग्य भाव मिळत नाही. सरकारने तुरी खरेदीसंदर्भात आडमुठे धोरण वापरून शेतकऱ्यांना चिंतातूर केले आहे. अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात म्हणून शिवसेनेकडून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. केंद्र व राज्यात आम्ही सत्तेत सहभागी आहोत. मात्र, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर शिवसेनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भूमीअधिग्रहन कायदा, समृद्धी रस्त्यालाही सेनेला कडाडून विरोध करून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी आक्रमकपणे लढा दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या "मन की बात' करण्यातच व्यस्त असतात. मात्र, त्यांना शेतकऱ्यांच्या "मन की बात' अद्यापही समजली नसल्याची टीका खासदार सावंत यांनी केली. शेतकरी बांधवांना "अच्छे दिन' आले का तुम्हीच सांगा, असा प्रश्न खासदार सावंत यांनी केल्यावर सभेला उपस्थित हजारो शेतकऱ्यांना हात वर करून नाही, अशा घोषणा दिल्या. या सभेनंतर खासदार सावंत यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. 

संबंधित लेख