रणजितदादा हरवले, आम्हाला नाही सापडले... 

रणजितदादा हरवले, आम्हाला नाही सापडले... 

अकोला : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पदवीधर, शिक्षकांना आश्वासनाच्या खिरापती वाटणाऱ्या गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याने पदवीधर, शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. 

डॉ. पाटलांनी दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने अघोषित शिक्षक या नावाने सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. "रणजितदादा हरवले, आम्हाला नाही सापडले,' अशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले डॉ. रणजित पाटील यांनी या मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्‍य घेत विजय मिळविला. निवडणूक काळात कायम विनाअनुदानित शाळांच्या मुल्यांकनाच्या जाचक अटी, अनुदान वितरणाचा प्रश्न, एक व दोन जुलैच्या अघोषित अनुदान घोषित करण्यासोबतच पदवीधर, शिक्षकांच्या सेवाविषयक ज्वलंत समस्या सोडविण्याची आश्वासने डॉ. पाटील यांनी अनेक सभांमध्ये दिली होती. 

अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर औरंगाबाद येथे लाठी हल्ला करण्यात येऊन पोलिसांनी अनेक शिक्षकांवर गुन्हे दाखल केले होते. त्या शिक्षकांवरील गुन्हे निवडणुकीपूर्वी मागे घेण्याचे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिल्याने अनेक शिक्षक संघटनांनी त्यांना निवडणुकीत पाठिंबा देऊन विजयी केले. राज्यात भाजपचे सरकार असून राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी म्हणून रणजित पाटील यांना पाहिल्या जाते. 

शिक्षकांच्या समस्या निकाली निघून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उद्देश साध्य करण्यासाठी शिक्षक संघटनांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जिवाचे रान करून रणजित पाटील यांना विजयी केले. मात्र, निवडणूक आटोपल्यानंतर रणजित पाटलांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याची ओरड शिक्षकांकडून होत आहे. त्यातूनच रणजित दादा हरवले, आम्हाला नाही सापडले....अशा उपरोधिक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल करून शिक्षकवर्ग रोष व्यक्त करीत आहेत. 

विशेष म्हणजे निवडणूक ही एकदाच होत नसून दर पाच वर्षांनी होते, याची आठवण ठेवण्याचा इशाराही या पोस्टच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने आगामी निवडणुकांमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण समजल्या जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com