akola politics | Sarkarnama

अकोल्याला हवे आणखी एक मंत्रिपद ! 

श्रीकांत पाचकवडे 
मंगळवार, 2 मे 2017

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता आमदार सावरकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास कार्यकर्त्यांसह पक्षाला अधिक बळकटी मिळणार असल्याची भावना भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करीत मंत्रिमंडळ विस्तारात अकोल्याला पुन्हा मंत्री पद देण्याची मागणी जोर धरत आहे. 

अकोला : राज्य मंत्रिमंडळाच्या खांदेपालटास भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याने जिल्ह्यातील भाजप आमदारांसह कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभेचा गड सर करण्यासाठी नव्या दमाच्या आमदारांना संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. 

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात चांगली कामगिरी करणाऱ्या भाजप आमदारांना योग्य संधी देण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी नव्या दमाने मोर्चेबांधणी करीत नगरपालिका, महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला. अकोला जिल्ह्यातील पाच पैकी तीन नगरपालिकांमध्ये भाजपने बहुमत मिळवीत सत्ता ताब्यात घेतली. तर अकोला महापालिकेत सर्वाधिक अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला. या निवडणुकीत खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला पूर्व आणि पश्‍चिम मतदार संघात येणाऱ्या प्रभागांमध्ये नियोजनबद्ध मोर्चेबांधणी करीत महापालिकेचा गड सर केला. अकोला पूर्व मतदार संघात येत असलेल्या 33 जागांपैकी 28 जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी करत आमदार सावरकर यांनी आपला दबदबा दाखवून दिला.

राज्यमंत्रीमंडळात डॉ. रणजित पाटील यांच्या रूपाने अकोल्याला एक मंत्रिपद मिळाले आहे. मात्र, डॉ. पाटील अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार असल्याने ते यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील कार्यक्रमातच अधिक व्यस्त असतात. जिल्ह्यातील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा ओढा आमदार सावरकर यांच्याकडे जास्त आहे.
 

संबंधित लेख