akola politics | Sarkarnama

वऱ्हाडात पेटले तूर आंदोलन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडवणुकीविरोधात विविध राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला असल्याने वऱ्हाडात तूर खरेदीचा प्रश्न पेटला आहे. 

अकोला : तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडवणुकीविरोधात विविध राजकीय पक्षांसह शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा एल्गार पुकारला असल्याने वऱ्हाडात तूर खरेदीचा प्रश्न पेटला आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत नाफेड तूर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी तातडीने सुरू न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिल्याने शासनासह प्रशासकीय यंत्रणेच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

यंदा तूर उत्पादन वाढणार असल्याची सरकारला पूर्वकल्पना असतानाही, 40 लाख क्विंटल तूर आयात करण्यात आली. आयात धोरणाचा मोठा प्रभाव धान्य बाजारपेठेत दिसून आला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची तूर कवडीमोल दराने खरेदीचा सपाटा लावला. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. सर्वत्र शेतकऱ्यांकडून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली. 

आवक वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात मोजक्‍याठिकाणी नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यावरही कागदपत्रांच्या जाचक अटी, महिना-महिना मोजमापासाठी प्रतीक्षा, निम्मे दिवस केंद्र बंद, बारदाना संपला, मनुष्यबळाचा अभाव, साठवणुकीची समस्या इत्यादी कारणांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले. परंतु, लागवड खर्चतरी मिळेल या अपेक्षेने शेतकरी हा सर्व त्रास सहन करून नाफेड केंद्राबाहेर अनेक दिवस प्रतीक्षेत होते. 15 मार्च रोजी या केंद्रांचा मुदत संपली. लाखो क्विंटल तूर अजूनही विक्रीसाठी प्रतीक्षेत असल्याने, आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी ही मुदतही संपली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे शिल्लक तूर विक्रीसाठी व्यापाऱ्यांशिवाय पर्याय उरला नाही. 

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट लक्षात घेऊन नाफेड खरेदी केंद्रावरच तूर खरेदी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, बाजार समितीमध्ये आंदोलन केले. खामगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा एल्गार पुकारला. वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा तुरी खरेदीच्या मुद्यावर प्रशासनाला धारेवर धरले आहे.  
 

संबंधित लेख