akola politics | Sarkarnama

अकोला कॉंग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 एप्रिल 2017

अकोला : गटबाजीच्या राजकारणामुळे महापालिका निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस अद्यापही शांत झालेली नाही. कॉंग्रेस कमिटीच्या मालकीच्या स्वराज्य भवनाचे पटांगण महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी भाडेतत्त्वावर देऊन चोवीस लाख जमा केले. मात्र, हा निधी पक्ष कार्यासाठी किंवा स्वराज भवनाच्या देखभालीसाठी त्यांनी वापरला नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदयांना चोवीस लाखांचा हिशोब विचारा, अशी मागणीच अकोला महानगर कॉंग्रेस कमिटीचे कोशाध्यक्ष गणेश कटारे यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. 

एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्ह्यात आजमितीस पक्ष रसातळाला गेला आहे. पक्षात कार्यकर्ते कमी आणि नेतेच जास्त वाढल्याने गटबाजीच्या राजकारणाला ऊत आला. त्यामुळे शह-काटशहाचे राजकारण वाढल्याने त्याचा फटका विविध निवडणुकांमध्ये कॉंग्रेसलाच बसला. महानगराध्यक्ष पदावर माजी आमदार बबनराव चौधरी यांच्या निवडीचा मुद्दाही महापालिका निवडणुका आधी चांगलाच गाजला. चौधरी यांच्या निवडीला पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी तीव्र विरोध करीत महानगराध्यक्ष हटविण्यासाठी धरणे आंदोलन करण्यापर्यंतची सीमा गाठली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दुसऱ्या फळीच्या नेत्यांच्या विरोधाला न जुमानता महानगराध्यक्ष पदावर बबनराव चौधरी यांना कायम ठेवले. महापालिका निवडणुकीची कमांड चौधरींकडे होती. या निवडणुकीत अठरा नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या कॉंग्रेस पक्ष तेरा नगरसेवकांवर आल्याने पक्षाच्या पराभवाचे खापरसुद्धा दुसऱ्या फळीने चौधरींच्याच डोक्‍यावर फोडण्याचा प्रयत्न केला. राज्यात सर्वत्रच हीच परिस्थिती असल्याने अकोला महानगराध्यक्ष नेतृत्व बदलाचे वारे पुन्हा शांत झाले. 

बबनराव चौधरींच्या मागचे शुल्ककाष्ठ काही जायचे नाव घेत नसल्याचे पक्षातील राजकीय कुरघोडीवरून दिसून येत आहे. अकोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कॉंग्रेस कमिटीच्या मालकीचे स्वराज्य भवन ही इमारत व त्याचे पटांगण आहे. मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे त्याला विविध व्यावसायिकांकडून सेल्सकरिता भाडेतत्त्वावर मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. या जागेच्या भाड्यापोटी बबनराव चौधरींनी चोवीस लाखाचा निधी जमा केला. मात्र, या निधीतून पक्ष कार्यासाठी किंवा स्वराज भवनाच्या देखभालीसाठी त्यांनी एक रुपयाही खर्च केला नसल्याचा आरोप कोशाध्यक्ष गणेश कटारे यांनी केला आहे. 

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी यामधील निधी खर्च केला नसून, या रकमेचा हिशोब प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याकडून घ्यावा. हा निधी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या बॅंक खात्यात जमा करावा किंवा अकोला शहर कॉंग्रेस कमिटीच्या नावाने बॅंक खाते उघडून त्यामध्ये जमा करावा, अशी मागणी कटारेंनी केली आहे. स्वराज भवन भाड्याने देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व महानगराध्यक्षांचा समावेश असलेली समिती स्थापना करण्याची मागणीही कटारे यांनी केली आहे. 

हिशोब द्यायला एका पायावर तयार : चौधरी 
गणेश कटारे हे सोळा वर्षांपासून कॉंग्रेसचे कोशाध्यक्ष असून, आधी त्यांनी भाड्याचा हिशोब द्यावा, असे कॉंग्रेस महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सांगितले. मुळात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या विषयावर मला अद्याप विचारणा केली नाही. ज्या दिवशी ते हिशोब विचारतील त्यांना एका पायावर हिशोब द्यायला तयार असल्याचे चौधरी म्हणाले. 

संबंधित लेख