akola poitics | Sarkarnama

अकोला महापालिकेचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

नगरविकासदिनाचे निमित्त साधून राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महापालिकांचा मुंबईत गौरव करण्यात आला. अकोला महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर विजय अग्रवाल आणि आयुक्त अजय लहाने यांचा गौरव केला. 

अकोला : नगरविकासदिनाचे निमित्त साधून राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महापालिकांचा मुंबईत गौरव करण्यात आला. अकोला महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर विजय अग्रवाल आणि आयुक्त अजय लहाने यांचा गौरव केला. 

राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती कमकुवत होत असल्याने शासन याबाबत अत्यंत गंभीर झाले होते. त्यामुळे महापालिकेने स्वहिस्यातून विकास कामे करण्यासोबतच शासनाच्या मूलभूत सुविधा नगरोत्थान, अमृत इत्यादी योजनांमध्ये आपला हिस्सा टाकण्याकरिता निधी उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर प्रमुख देणी वेळेत अदा करता यावी यासाठी मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता उत्पन्न वाढीचे स्रोत निर्माण करून त्यानुसार वसुलीची कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने अकोला महापालिकेने मालमत्ता करासह बाजार दैनंदिन वसुली, व्यापारी संकुलांचे करारनाम्यांचे नूतनीकरण करून भाव वाढ करणे तसेच परवाना शुल्क, बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी कर इत्यादी बाबत विशेष मोहीम राबविली. 

महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून फेरमूल्यांकन जीआयएस प्रणालीव्दारे करून आर्थिकदृष्ट्या डबघाईस असलेल्या महापालिकेच्या उत्पन्नात भरघोस वाढ केली. नागरिकांना मनपाकडून भेटणारे दाखले सोबतच कर भरण्यासाठी महापालिका कार्यालयात येण्याची आवश्‍यकता भासणार नाही यासाठी ऑनलाइन प्रणालीव्दारे सर्व कामे करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे सुरू आहे. 

ही महत्त्वपूर्ण कामे करतानाच उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला महापालिकेचा गौरव केला. त्यांनी महापौर विजय अग्रवाल व आयुक्त अजय लहाने यांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकांनी अकोला महापालिकेसारखे जीआयएस. प्रणालीव्दारे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपापल्या महापालिकेमध्ये मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचे कार्य करून उत्पन्नात वाढ करण्याचे, उत्पन्न वाढीसाठी ऑनलाइन पद्धती विकसित करण्याचे आवाहन केले. या वेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, स्वीय सहायक सुनील म्हैसकर आदींची उपस्थिती होती. 

संबंधित लेख