akola-pande-shivsena-issue | Sarkarnama

पांडे गुरुजींच्या पक्षप्रवेशावरून अकोला शिवसेनेत गृहयुद्ध

श्रीकांत पाचकवडे 
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये शितयुद्ध सुरू आहे. पांडे गुरुजी यांच्या पक्षप्रवेशाला पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांचा विरोध आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया पांडेंच्या समर्थनात उभे ठाकले असल्याने शिवसेनेत सध्या गृहयुद्ध पेटले आहे. 

अकोला : शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या पक्षप्रवेशावरून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये शितयुद्ध सुरू आहे. पांडे गुरुजी यांच्या पक्षप्रवेशाला पश्‍चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांचा विरोध आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया पांडेंच्या समर्थनात उभे ठाकले असल्याने शिवसेनेत सध्या गृहयुद्ध पेटले आहे. 

जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी हे एकमेकांचे राजकीय विरोधक समजल्या जातात. त्यांच्यातील राजकीय वाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून वाढला. जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या भारिप-बमसंला पायऊतार करण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेना, कॉंग्रेससोबत हातमिळवणी करीत काही अपक्ष सदस्यांना सोबत घेतले. नितीन देशमुख हे जिल्हा परिषदेत अपक्ष निवडूण आले असल्याने त्यांना अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले. 

मात्र, देशमुख यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले चंद्रशेखर पांडे गुरूजी यांच्यासह शिवसेनेच्या सदस्या सौ. गावंडे यांचा विरोध होता. त्यातूनच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पांडे तटस्थ राहिले तर गावंडे यांनी थेट भारिप-बमसंला मतदान करीत सभापती पद मिळविले. या बंडखोरीनंतर पांडे आणि गावंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच नितीन देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत त्यांची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लावण्यात आली. 

या घटनेला अडीच वर्षांचा कालावधी झाला असला तरी चंद्रशेखर पांडे यांच्यामुळेच आपले जिल्हा परिषद अध्यक्षपद हुकल्याची सल नितीन देशमुख यांच्या मनात आजही कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळेच पांडे गुरुजी यांच्या पक्षप्रवेशाला सातत्याने विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पांडे गुरूजींच्या पक्ष प्रवेशाला आमदार गोपीकिशन बाजोरिया समर्थन करतात तर खासदार अरविंद सावंत आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख विरोधात आहेत. त्यातूनच शिवसेनेत गृहयुद्ध पेटले आहे. 
 

संबंधित लेख