Akola news : Supriya Sule at NCP meet | Sarkarnama

एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचे काम बंद करा : सुप्रिया सुळे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जून 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची संधी आहे. पक्षाला बाहेरच्या शत्रूंची भीती नाही. पक्षांतर्गत एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचे काम बंद करून शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचे काम करा. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना करताना बांधलेली संघटना पुन्हा उभी करून दाखवा.

- खासदार सुप्रिया सुळे

अकोला : "राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची संधी आहे. पक्षाला बाहेरच्या शत्रूंची भीती नाही. पक्षांतर्गत एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचे काम बंद करून शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचे काम करा. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना करताना बांधलेली संघटना पुन्हा उभी करून दाखवा,'' असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

अकोला येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतल्यानंतर उत्तर देताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "अकोला येथील जनता जागेवर आहे. पदाधिकारीही जागेवर आहेत. पक्षाने घेतलेले काही निर्णय चुकले असा सूर कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पवार साहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे. अजितदादा, सचिन अहीर यांनी या जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी दिला असल्याचे कार्यकर्तेच सांगत आहे. पक्ष म्हटला की एक कुटुंब आणि कुटुंबात भांड्याला भांडे लागतच असते. वाद असावेत, मात्र टोकाचे मनभेत नसावेत. त्यामुळे व्यासपीठावरील लोकांनी एकत्र येऊन पुन्हा चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी काहीतरी मार्ग काढवा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. शेवटचा कार्यकर्ता भरडला जात असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडणुकीत कुणी पराभूत करू शकते असेल, तर तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आहे. पक्षाला बाहेरच्या शत्रुंची भिती नाही. एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचे काम सोडून एकदिलाने सर्वांनी काम केले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेतेच चांगले प्रशासन चालवू शकतात, हा विश्‍वास जनतेला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे गांभिर्याने काम करण्याची गरज आहे. हलगर्जीपणा झटकून सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आवश्‍यक आहे. पक्ष कार्यासाठी कुणाला आमंत्रण देण्याची गरज नाही.'' 

पवार साहेबांना बांधलेली संघटना पुन्हा उभी करून दाखवायचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, डॉ. आशाताई मिरगे, डॉ.संतोषकुमार कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, विश्‍वानाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, महानगराध्यक्ष अजय तापडिया, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्माताई अहिर, महानगराध्यक्षा मंदाताई देशमुख आदींची उपस्थिती होती. 

सोशल मीडियावर भर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेले काम जनेतपुढे मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सेवादल आणि युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर देण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

गाव तेथे शाखा, घर तेथे झेंडा! 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेला संदेश खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अकोला येथील कार्यकर्त्यांनाही दिला. गाव तेथे शाखा, घर तेथे राष्ट्रवादीचा झेंडा ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

पदाधिकाऱ्यांनी काढली उणीदुणी 
पक्षाच्या आढावा बैठकीत नेत्यांपुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांची उणीदुणी काढण्याची स्पर्धाच लागली होती. महापालिका निवडणुकीत झालेल्या तिकिट वाटपाचा घोळ, पक्ष निरीक्षकांकडून होत असलेली दिशाभूल, स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी नेत्यांपुढे मांडण्यात आल्या. 

कार्यकर्त्यांनी कोणत्या समस्या मांडल्या? 

 • पक्षात कुणीही सामान्य कार्यकर्त्यांचे ऐकूण घेत नाही. 
 • प्रामाणिक कार्यकर्ते केवळ गर्दी वाढविण्यासाठीच आहेत, त्यांचा पुढे कुठे विचार होत नाही. 
 • निवडणुका आल्या की, बॅंक बॅलेन्सचा विचार होतो. 
 • युवक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. 
 • पक्षात शिस्त राहली नाही. 
 • सामान्य कार्यकर्त्यांचे कार्य नेत्यांपर्यंत पोहोचत नाही. 

पक्ष संघटनेसाठी कोणत्या उपाययोजना सुचविल्या? 

 • पक्ष निरीक्षक ही पद्धत बंद करावी. 
 • जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची समिती बनवून, या समितीच्या मार्गदर्शनात जिल्हा व शहर अध्यक्षांनी काम करावे. 
 • प्रत्येक तालुक्‍याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांना सोपवून, त्यांना सर्वाधिकार द्यावे. 
 • युवक कार्यकर्त्यांचा आगामी निवडणुकासाठी प्राधान्याने विचार व्हावा. 
 • पक्ष संघटनेतील ढिसाळ कारभार सुधारावा.

संबंधित लेख