"स्वाभिमानी'ला वांझोट्या मंत्रिपदात स्वारस्य नाही : रविकांत तुपकर 

"स्वाभिमानी'ला वांझोट्या मंत्रिपदात स्वारस्य नाही : रविकांत तुपकर 

अकोला : शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. वस्रोद्योग महामंडळाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून दिल्यावरही भाजपचे काही नेते राजीनामा फेटाळल्याचे म्हणत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. मात्र, ज्या सरकारला शेतकऱ्यांचे दुःख कळले नाही त्यांच्याशी आम्ही महायुती तोडली आहे. "स्वाभिमानी'ला कोणत्याही वांझोट्या मंत्री पदात स्वारस्य नसून आम्हाला केवळ शेतकरी हित जपायचे आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. 

केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजप सरकार विरुद्ध शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र राज्य वस्रोद्योग महामंडळाचा राजीनामा दिल्यानंतर रविकांत तुपकर यांचे बुधवारी (ता.सहा) बुलडाणा येथे आगमन झाले. यावेळी पश्‍चिम विदर्भातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शेतकरी हितासाठी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा त्याग केल्याबद्दल तुपकर यांचा जंगी सत्कार केला. या कार्यक्रमास प्रतिष्ठीत शेतकरी नेताजीराव पवार, बबनराव चेके, गजानन पाटील, भगवानराव मोरे, राणा चंद्रशेखर चंदन, गजानन फाटे, मयुर बोर्डे, सतीष मोरे, दामोदर इंगोले, राजू नाईकवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी भाजप सरकारवर कडाडून टिका केली. 

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले असून आता तर शेतकऱ्यांची मुले-मुलीही आत्महत्या करताहेत. कर्जमाफीच्या जाचक अटी लादून शेतकऱ्यांना माफी मिळू नये, अशी व्यवस्था या सरकारने केली आहे. नवऱ्याला कर्जमाफी द्यायची आणि बायकोला द्यायची नाही, असे नवरा-बायकोत भांडणे लावण्याचे काम या सरकारने केले आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे आमचीसुद्धा घुसमट होत होती. त्यामुळेच या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भाजपचे काही नेते माझा राजीनामा फेटाळल्याच्या बातम्या पसरवून आमच्याशीच नांदा म्हणून गळ घालत आहेत. पण स्वाभिमानीला शेतकरी हितात स्वारस्य असून आम्हाला वांझोटे मंत्री पद घेऊन मिरविण्यात कोणतेही स्वारस्य नाही. निव्वळ मंत्री पदासाठी आम्ही जन्माला आलो नाही. यापुढे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर आंदोलनाची धार अधिक तीव्र करून शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com