Akola news coporator parag kambale criticizes municipal commissioner | Sarkarnama

अकोल्यातील शौचालय घोटाळ्यावर आयुक्त गप्प का : नगरसेवक पराग कांबळे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

शिस्तप्रिय व पारदर्शक कारभाराचा डिंडोरा पिटणारे महापालिका आयुक्त अजय लहाने शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या 25 कोटीच्या घोटाळ्यावर गप्प का? असा सवाल उपस्थित करीत या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांसह सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांनी हात ओले केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी केला आहे. 

अकोला : शिस्तप्रिय व पारदर्शक कारभाराचा डिंडोरा पिटणारे महापालिका आयुक्त अजय लहाने शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या 25 कोटीच्या घोटाळ्यावर गप्प का? असा सवाल उपस्थित करीत या घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांसह सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांनी हात ओले केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक पराग कांबळे यांनी केला आहे. 

अकोला महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्यावर सत्ताधारी भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आयुक्त लहाने हे मनमानी कारभार करीत असून नगरसेवकांना उद्धट वागणूक देणे, नगरसेवकांनी सुचविलेल्या प्रभागातील समस्यांवर उपाययोजना, विकास कामांकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक मुद्यावरून आयुक्तांवर अविश्वास आणण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपच्या या प्रस्तावाने महापालिकेचे राजकीय वातावरण तापले असताना आता त्यात भर म्हणून कॉंग्रेस नगरसेवक पराग कांबळे यांनी प्रशासनाच्या पारदर्शक कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत 25 कोटीचा शौचालय घोटाळा बाहेर काढल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. 

शहरात तसेच हद्दवाढ झालेल्या भागात महिला बचत गटांच्या नावावर अकोट फाईल, पंचशीलनगर, खरप, खदान, शिवणी, वाशिम बायपास, उमरी, गुलजारपुरा, नायगांव आदी भागात महिला पदाधिकारी तसेच स्थानिक महिलांनी बचत गटांच्या नावावर वैयक्तीक शौचालये बांधली आहेत. मात्र, अनेक भागात जुनेच शौचालय नवीन दाखवून कोट्यवधीचा मलीदा लाटण्याचे काम प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने करण्यात आल्याचा आरोप पराग कांबळे यांनी केला आहे. 

विशेष म्हणजे ही कोट्यावधी रुपयांची देयके केवळ स्वच्छता निरिक्षक यांच्या स्वाक्षरीने पडताळणी करून काढण्यात आली आहेत. येवढ्या मोठ्या प्रमाणात निधी वितरीत करण्यात येत असतांना प्रशासनातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांची त्यावर स्वाक्षरी नाही. महापालिकेत येवढा मोठा घोटाळा होत असतांना आयुक्तांनी या गंभीर प्रकरणात चुप्पी साधल्याने प्रशासनाचा "अ'पारदर्शक कारभार जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा नगरसेवक पराग कांबळे यांनी दिला आहे. या प्रकरणात कांबळे यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यावर सभापतींनी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या महापालिकेत सुरू असलेल्या सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वाद आणखी चिघळणार आहे. 

संबंधित लेख