akola-ncp-santoshkumar-korape-gulabrao-gawande-era-begins-vijay-deshmukh-era-come-to-end | Sarkarnama

अकोला : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील `विजय पर्व' संपले! कोरपे, गावंडे गटाचे वर्चस्व वाढणार 

मनोज भिवगडे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

अकोला : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा मंगळवारी झाली. त्यासोबतच जिल्ह्यात सुरू असलेले "विजय पर्व'ही संपले. आता माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या गटाला `अच्छे दिन' आले आहेत. 

अकोला : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा मंगळवारी झाली. त्यासोबतच जिल्ह्यात सुरू असलेले "विजय पर्व'ही संपले. आता माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या गटाला `अच्छे दिन' आले आहेत. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत निष्ठा ठेवून असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक डॉ. सतोषकुमार कोरपे. मात्र, मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये व्यासपीठाची शोभा वाढविणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्येच गणल्या जात होते. याच काळात कॉंग्रेसमधून नारायण राणे गटाचे कट्टर समर्थक मानले जाणारे विजय देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर विजय देशमुख यांच्याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे आली. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीला जिल्ह्यात भरभराटी मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, गटातटाच्या राजकारणातच राष्ट्रवादीचा गावगाडा रुतून बसला. 

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. पाच नगरसेवक निवडून आले. या नगरसेवकांना मैत्री जोपासण्यासाठी ज्या प्रमाणे सत्ताधारी भाजपच्या "विजय' मागे फरफटावे लागत आहे, ते पक्षश्रेष्ठींपासून लपून राहिले नाही. या सर्व घडामोडी सुरू असताना प्रदेशची धुरा महाराष्ट्रातील राजकारणाची खडा न्‌ खडा माहिती असलेल्या जयंतराव पाटील यांच्या खांद्यावर आली. त्यांनी राज्यात राष्ट्रवादीच्या संघटन मजबुतीचा "एजन्डा' सर्वप्रथम हाती घेतला. सर्व संच बदलूनच आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. त्याप्रमाणे अकोल्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हित जोपासू शकणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. सर्वप्रमथ त्यांनी डॉ. संतोषकुमार कोरपे आणि विदर्भ वैधानिक मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर यांना कार्यरत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून एक-एक कडी जोडत त्यांनी ज्येष्ठ आणि युवकांची सांगड घालत राष्ट्रवादीला एक नवा चेहरा जिल्ह्यात देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

जिल्ह्यातील बोटावर मोजण्या इतक्‍या कल्पक युवा नेत्यांमध्ये गणणा होत असलेल्या संग्राम गावंडे यांच्याकडे जिल्ह्याध्यक्ष पदाची सूत्रे देवून त्यांनी तरुणाईला जोडण्यास सुरुवात केली. एकीकडे संग्राम गावंडे यांचे जिल्ह्यातील नेटवर्क आणि दुसरीकडे डॉ. कोरपे यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देवून त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा केला प्रयत्न यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकोला जिल्ह्यातील दिवस पालटल्या शिवाय राहणार नाही. 
 

संबंधित लेख