akola-ncp-sangram-gawade-district-president | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी संग्राम गावंडे

मनोज भिवगडे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठी जबाबदारी सोपविली आहे. मा. शरद पवार, मा. अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मागर्दशनात जिल्ह्यात सर्वांना सोबत घेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. 
- संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे विदर्भ समन्वयक संग्राम गुलाबराव गावंडे यांची अकोला जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वी त्यांच्या रुपाने एका युवा नेतृत्वावर जिल्ह्यात पक्षाला उभारणी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

माजी राज्यामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपविण्याचा निर्णय मंगळवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. अनेक दिवसांपासून जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचा प्रतीक्षा केली जात होती. विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांच्याकडून ते जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. 

राजकीय कारकिर्द
संग्राम गावंडे यांनी तरूणपणातच राजकीय कारकिर्द सुरू केली आहे. शिवसेनेत असताना त्यांच्याकडे एप्रिल २०११ मध्ये महानगरप्रमुखाची सूत्रे सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यावेळी शिवसेनेने २०१२ त्या मनपा निवडणुकीत चांगले यश मिळविले होते. त्यानंतर अडीच वर्षे त्यांनी युवासेना जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. २०१६ मध्ये ते वडिलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादीत त्यांच्याकडे युवक आघाडीचे विदर्भ संघटकपद सोपविण्यात आले. अल्पावधितच विदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीची बसविलेली घडी आणि त्यातून पॅरेन्ट बॉडीच्या कार्यक्रमांना मिळालेले बळ बघता त्यांच्याकडे अकोला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. 

पहिली कसोटी जिल्हा परिषद 
अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. योगायोगाने संग्राम गावंडे यांची जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांचा प्रभाग प्रारुप आराखडाही मंगळवारीच जाहीर झाला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून संग्राम गावंडे यांची पहिली कसोटी जिल्हा परिषद निवडणुकीतच होणार आहे. 
 

संबंधित लेख