akola muncipal corporation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

भारिप - बमसंचा महापौरांच्या घराला घेराव, चहापानही आणि पोलिसांचीही मदत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अकोला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारणाऱ्या भारिप-बमसंच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांच्या घराला घेराव घातला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही भारिपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्याचवेळी महापौराच्या घरी व सत्ताधारी नगरसेवकांना या आंदोलनाची पुर्वकल्पना असल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांचा यथोचित आदरातिथ्य करीत चहा-पाण्याची व्यवस्था केली.

अकोला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारणाऱ्या भारिप-बमसंच्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांच्या घराला घेराव घातला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही भारिपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्याचवेळी महापौराच्या घरी व सत्ताधारी नगरसेवकांना या आंदोलनाची पुर्वकल्पना असल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांचा यथोचित आदरातिथ्य करीत चहा-पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या आंदोलनाची थार बोथट करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अकोला महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीचा मुद्दा सध्या पेटला आहे. सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिन चे स्वप्न दाखवित सत्तेवर आलेल्या भाजपने महापालिकेत अवाजवी करवाढ करून अकोलेकरांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार केल्याचा आरोप भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. या करवाढीला तीव्र विरोध करीत भारिप-बमसंच्या महापालिकेतील गटनेत्या डॉ. धनश्री अभ्यंकर, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे यांनी सभागृहात करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी रेटून धरली होती. उद्या (ता.19) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीवर पुर्नविचार करण्याचा प्रस्ताव असल्याने करवाढीचा 3 एप्रिल रोजी घेण्यात आलेला ठरावच रद्द करण्याच्या मागणीसाठी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक हरिष आलिमचंदाणी यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांच्या घराला घेराव घालण्यात आला. 

यावेळी भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे, गटनेत्या धनश्री अभ्यंकर, माजी नगरसेवक गजानन गवई, जिल्हा सचिव राजुमिया देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिमा अवचार, सम्राट सुरवाडे, विकास सदांशिव, जीवन डिगे, वंदना वासनिक, प्रा. संतोष मोहोड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापौर अग्रवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या घराला घेराव घातला. यावेळी महापौर बाहेरगावी असल्याने त्यांच्या पत्नी नगरसेविका सुनिता अग्रवाल यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 
आंदोलन की "चाय पे चर्चा' ? 
महापालिकेने केलेल्या करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने आज महापौर, उपमहापौरांसह भाजपच्या नगरसेवकांच्या घराला घेराव घालण्याचे आंदोलन केले. मात्र, सत्ताधारी भाजपला या आंदोलनाची पुर्वकल्पना असल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांचा यथोचित आदरातिथ्य करीत चहा-पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या आंदोलनाची थार बोथट करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
आंदोलनाची पुर्वकल्पना असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्यासाठी आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे यथोचित आदरातिथ्य करून त्यांना चहा, पाण्याची व्यवस्था केली. महापौर विजय अग्रवाल बाहेरगावी असल्याने त्यांच्या पत्नी नगरसेविका सुनिता अग्रवाल यांच्यासह इतरही नगरसेवकांच्या घरी आंदोलनकर्त्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून स्वतः सुनिता अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, हरिष आलिमचंदाणी यांनी आंदोलनकर्त्यांना आग्रहाने चहा, पाणी दिले. या आदरातिथ्यामागे भारिपच्या आंदोलनाची धार बोथट करण्यात भाजपला यश आले असून भारिप-बमसंचे आंदोलन की भाजपशी "चाय पे चर्चा' झाली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
काही पदाधिकाऱ्यांनी नाकारला चहा 
भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांना चहा-पाणी देणे सुरू असताना प्रसिद्धी माध्यमाचे कॅमेरे सुरू असल्याचे लक्षात येताच भारिप-बमसंच्या काही पदाधिकाऱ्यांनी चहा नाकारला. तर काही जणांनी गरमा-गरम चहाचा आस्वाद घेतला. 

 

संबंधित लेख