अकोला महापालिका सभेत विरोधी पक्षनेत्याचे सदस्यत्व रद्द

  अकोला महापालिका सभेत विरोधी पक्षनेत्याचे सदस्यत्व रद्द

अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांसाठी शासनाकडून 20 कोटी मिळाले. या निधीतून प्रस्तावित काम करताना नगरसेवकाला विश्‍वासात न घेता परस्पर इतर प्रभागात निधी वळती करण्यात आला. याचा जाब सभागृहात विचारणारे विरोधी पक्ष नेते आणि कॉंग्रेस सदस्यांना बोलण्यास मनाई करण्यात आली. त्यावरून सभागृहात सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्ष नेत्यांनी डायस फेकून दिला. एका नगरसेवकाने राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर विजय अग्रवाल यांनी आधी विरोधी पक्ष नेते व कॉंग्रेसच्या एका सदस्याला निलंबित केले. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव घेवून तो मंजूर करण्यात आला. 

अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. शहर स्वच्छतेच्या मुद्यावर ठराव घेण्याच्या उद्देशाने ही सभा महत्त्वाची होती. मात्र, सभा सुरू होताच विरोधी पक्ष नेते कॉंग्रेसचे साजिद खान पठाण यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील पथदिव्यांचा 40 लाखांचा निधी झोन बदली करून वळती का करण्यात आला, याचे स्पष्टीकरण सभागृहात देण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी हा विषय आता सभागृहात घेता येणार नाही, असे सांगूण चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कॉंग्रेसचे सर्वच सदस्य महापौरांपुढील मोकळ्या जागेत एकत्र झाले आणि महापौरांच्या एकाधिकारशाहीचा निषेध करू लागले. 

महापौरही सदस्यांचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हते. दरम्यान, विरोधी पक्ष नेत्यांनी डायस फेकल्याने सभागृहाचे वातावरण तापले. त्यावर महापौरांनी विरोधी पक्ष नेत्याला निलंबित करण्यात आले असून, त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच नगरसेवक मोहम्मद इरफान यांनी राजदंड उचलून तो सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षांनी त्यांच्या हातातून तो काढून घेत जागेवर ठेवला. 

या कारणास्तव इरफान यांनाही निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश महापौरांनी दिला. दोघांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. मात्र, ते बाहेर जाण्यास तयार नसल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. परंतु, साजिद खान यांनी बळजबरी केल्यास सभागृहात "राडा' करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांची पोलिसांनी समजूत काढली. महापौरांनी दोघांनाही बाहेर काढल्याशिवाय पुढे सभागृह चालू न देण्याचा निर्णय घेतला. अखेर कॉंग्रेस सदस्य बाहेर निघून गेल्यावर सभा पुढे सुरू झाली. तब्बल अर्धातास हा गोंधळ सुरू होता. 

कॉंग्रेसचा सभात्याग 
महापौर सभागृहात मनमानी करीत असल्याचा आरोप करीत कॉंग्रेस सदस्यांनी विरोधी पक्ष नेते व नगरसेवकाच्या निलंबनाचा निषेध करीत सभात्याग केला. साजिदखान पठाण, इकबाल सिद्धिकी, डॉ. झिनान हुसेन, इरफान खान, पराग कांबळे यांच्यासह कॉंग्रेसचे सर्वच सदस्य सभागृहातून बाहेर पडले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com