अकोल्यात लाल दिव्याच्या गाडीसाठी रस्सीखेच 

 अकोल्यात लाल दिव्याच्या गाडीसाठी रस्सीखेच 

अकोला ः महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अकोल्याचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने या पदासाठी विजय अग्रवाल, हरीश आलिमचंदानी, गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे हे प्रबळ मानले जातात.

मात्र, महापालिकेत विजयी झेंडा फडकविण्यात खासदार संजय धोत्रे गट यशस्वी झाल्याने महापौरपदावर धोत्रे गटाचा वरदहस्त असलेल्या नगरसेवकांचीच महापौरपदावर वर्णी लागणार असल्याने यंदा लाल दिव्याची गाडी कोणाला मिळणार, याबाबत अकोलेकरांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. 

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारली. गत पंधरा वर्षांपासून महापालिकेत शिवसेनेशी असलेल्या युतीचा काडीमोड करीत भाजपचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी केली. त्याला यश मिळाले असून भाजपने ऐंशी सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी असलेला एकेचाळीस हा आकडा पार करीत अठ्ठेचाळीस नगरसेवकांसह एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती या महत्त्वाच्या पदावर भाजपच्या नगरसेवकाची वर्णी लागणार आहे.

पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून विजय अग्रवाल महापौरपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा अनुभवही त्यांची दावेदारी मजबूत करण्यास पोषक ठरणारी आहे. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खासदार संजय धोत्रे यांचे भक्कम पाठबळ त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र, सध्याचे आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध आणि त्यातून निर्माण होऊ शकणारा प्रशासकीय पेच त्यांच्यासाठी अडसर ठरू शकतो. अग्रवाल यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे हरीश आलिमचंदानी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी पूर्वी नगरपरिषदेच्या काळात नगराध्यक्षपद सांभाळले आहे.

महापालिकेच्या स्थापनेपासून ते सातत्याने निवडून येत आहे. त्यामुळे महापौरपदासाठी त्यांचाही दावा प्रबळ मानल्या जात आहे. त्यांची जमेची बाजू म्हणजे पालकमंत्री डॉ. पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक. त्यामुळे महापौर निवडताना डॉ. पाटील यांच्याकडून आलिमचंदानी यांचे नाव रेटल्या जाऊ शकते. महापालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या अठ्ठेचाळीस नगरसेवकांपैकी चोवीस महिला नगरसेवक आहेत. त्यामुळे महिला नगरसेवकांकडूनही महापौरपदासाठी दावेदारी केली जाऊ शकते. असे झाल्यास ज्येष्ठतेनुसार सगल दुसऱ्यांदा नगरसेविका झालेल्या गीतांजली शेगोकार आणि अकोल्याचा पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचा विचार होऊ शकतो.

गावंडे या सलग चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. मात्र, यापूर्वी त्यांनी महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांचा पुन्हा होणार का, हा प्रश्‍नच आहे. दुसरीकडे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे निकटवर्तीय म्हणून गीतांजली शेगोकार यांचा दावा अधिक प्रबळ आहे. शिवाय खासदार संजय धोत्रे यांच्याकडूनही त्यांच्या नावाची शिफारस होऊ शकते. अर्थातच महिलांना महापौरपद देण्याचा विचार झाला तरच ही दोन्ही नावे चर्चेत येईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com