akola-haridas-bhade-on-reservation-of-dhanagar-muslim-koli-dhobi | Sarkarnama

धनगर, मुस्लिम, कोळी, धोबी समाजाला दिलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर : हरिदास भदे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

गेल्या 40 वर्षांपासून धनगर, मुस्लीम, कोळी, धोबी समाजाच्या आरक्षणावर भाजप सरकार केवळ पोकळ आश्वासने देत आहे. मुख्यमंत्र्यांना या समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असून "सीएम साहेब, क्‍या हुआ तुम्हारा वादा,' अशी म्हणण्याची पुन्हा वेळ आली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक तथा माजी आमदार हरिदास भदे यांनी सांगितले. 

अकोला : उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ आश्वासनांच्या खैराती वाटत आहेत. मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र, गेल्या 40 वर्षांपासून धनगर, मुस्लीम, कोळी, धोबी समाजाच्या आरक्षणावर भाजप सरकार केवळ पोकळ आश्वासने देत आहे. मुख्यमंत्र्यांना या समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असून "सीएम साहेब, क्‍या हुआ तुम्हारा वादा,' अशी म्हणण्याची पुन्हा वेळ आली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक तथा माजी आमदार हरिदास भदे यांनी सांगितले. 

निवडणुक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सत्तेत बसवा. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत येऊन साडेचार वर्षांचा कालावधी झाला. तरी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे जुमलेबाज सरकार असून आश्वासना पलीकडे या सरकारने काहीच केले नाही. गेल्या 40 वर्षांपासून धनगर समाज उपेक्षितांचे जीवन जगत आहे, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील काही जिल्ह्यांत या समाजाची अवस्था तर आदिवासींपेक्षाही बिकट आहे. मात्र, या समाजबांधवांच्या व्यथा सत्ताधारी भाजप सरकार समजू शकले नसल्याचे श्री. भदे म्हणाले. धनगर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उत्थानासाठी या सरकारने काहीच केले नाही. धनगर समाजाप्रमाणेच मुस्लीम, कोळी, धोबी समाजाला केवळ आश्वासने देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत विधीमंडळाच्या पुढच्या अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा एटीआर मांडल्या जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, आता आमचा त्यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचे हरिदास भदे यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख