akola-ex-mla-haridas-bhade-actively-working-with-prakash-ambedkar | Sarkarnama

वंचित बहुजन आघाडीमुळे माजी आमदार हरिदास भदेंचे वजन वाढले 

श्रीकांत पाचकवडे 
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

भारिप बहुजन महासंघातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षात बाजूला सारले गेलेले माजी आमदार हरिदास भदे पक्ष कार्यात पुन्हा जोमाने सक्रीय झाले आहेत. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या विविध कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूला हरिदास भदे यांची वर्णी लागत असल्याने पक्षातंर्गत विरोधकांची धडकी भरणे सुरू झाले आहे. 

अकोला : भारिप बहुजन महासंघातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे पक्षात बाजूला सारले गेलेले माजी आमदार हरिदास भदे पक्ष कार्यात पुन्हा जोमाने सक्रीय झाले आहेत. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या विविध कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूला हरिदास भदे यांची वर्णी लागत असल्याने पक्षातंर्गत विरोधकांची धडकी भरणे सुरू झाले आहे. 

बहुजन, मागासवर्गीय चळवळीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रीत करणारा भारिप बहुजन महासंघाचा सोशल इंजिनिअरिंगच्या अकोला पॅटर्नची वाट चळवळीचे मुळ केंद्र असलेल्या अकोल्यातच बिकट झाली होती. पक्षातंर्गत वाढलेले गटा-तटाचे राजकारण आणि त्यातून सुरू झालेल्या कुरघोड्यांमुळे अनेक निष्ठावंत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाजूला सारले गेले होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील काहींनी केलेल्या बंडखोरीमुळे हरिदास भदे यांना आमदारकीची हॅटट्रीक साधता आली नाही. त्यामुळे पक्षात वाढलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे भदे काही वर्ष बाजुला सारल्या गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात तर भदेंना सभा, बैठकांना बोलविणेही टाळल्या जात होते. ही बाब पक्ष नेतृत्वापर्यंत पोचल्यावर वेळोवेळी अनेकांच्या कानउघाडण्या झाल्याचे बोलल्या जाते. 

गेल्या वर्षभरापासून प्रकाश आंबेडकर यांनी धनगर आरक्षण आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या राजकीय पटलावर नवीन समीकरण उदयास आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यात धनगर समाजाचे नेतृत्व करीत असलेले हरिदास भदे यांना आंबेडकरांनी सक्रीयपणे सहभागी केल्याचे दिसून येते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाने एमआयएमशी आघाडी केली आहे. मागासवर्गीय, मुस्लीम समाजासोबतच राज्यात मोठ्या संख्येने असलेला धनगर समाज वंचित बहुजन आघाडीशी जोडल्या जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वंचीत बहुजन आघाडीच्या राज्यभर होत असलेल्या सभांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या बाजूला हरिदास भदे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
 

संबंधित लेख