अकोल्यात काँग्रेसचा ‘एमकेएम’ पॅटर्न; ‘वंचित’कडून ‘डीएमके’वर भर!

भाजपचा हिंदू मतदारांमधील प्रभाव बघता काँग्रेसने नागपूरच्या धर्तीवर अकोल्यात ‘एमकेएम’ अर्थात मुस्लीम, कुणबी, माळी पॅटर्न राबविण्यावर भर दिला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीने परंपरागत दलित मतदारांसोबतच मुस्लीम आणि कुणबी मतदार अर्थात ‘डीएमके’ यांना रिझविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
अकोल्यात काँग्रेसचा ‘एमकेएम’ पॅटर्न; ‘वंचित’कडून ‘डीएमके’वर भर!

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमदेवारांकडे काही तास शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रमुख तिन्ही उमेदवार सामाजिक समिकरणं जुळविण्यात गुंतले आहेत. 

भाजपचा हिंदू मतदारांमधील प्रभाव बघता काँग्रेसने नागपूरच्या धर्तीवर अकोल्यात ‘एमकेएम’ अर्थात मुस्लीम, कुणबी, माळी पॅटर्न राबविण्यावर भर दिला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीने परंपरागत दलित मतदारांसोबतच मुस्लीम आणि कुणबी मतदार अर्थात ‘डीएमके’ यांना रिझविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

अकोला लोकसभा मतदारसंघात विकास हा मुद्दा प्रचारात नेहमी गौण राहिला आहे. चर्चा विकासाच्या मुद्यावरून सुरू होत असली तरी शेवट मात्र जात-पात आणि धर्मावरच होतो. ते यावेळीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून दिसून येत आहे. भाजपने या मतदारंसघात केलेली सामाजिक व धार्मिक बांधणी ही विरोधकांवर नेहमीच वरचढ ठरत आली आहे. त्याला काटशह देण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आणि यावेळीही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून त्यावर भर दिला जात आहे. 

सोमवारी काँग्रेसने मराठा मंगल कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित केलेला सकल मराठा समाज मेळावा त्याचाच एक भाग होता. या मेळाव्यात मराठा समाजातील कुणबी समाजातील बहुतांश नेते व समाजबांधवांची हजेरी आणि सकल मराठा कुणबी समाज पुस्तीकेचे विमोचन हा सर्व घटनाक्रम काँग्रेसच्या प्रचाराची दिशा स्पष्ट करणारी आहे. मुस्लीम उमेदवार असल्याने हा घटकसोबत आहेच. त्यात माळी समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. त्यासाठी माळी बहुल परिसरात बैठकांचा धडका काँग्रेसने सुरू केला आहे. 

प्रचाराचा हाच पॅटर्न काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडीतर्फेही राबविला जात आहे. ‘वंचित’ची परंपरागत ‘व्होट बँक’ बाैद्ध समाजासोबतच मुस्लीम आणि कुणबी हे घटक कसे प्रभावित होतील, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.   

जिल्हा परिषद, विधानसभेचा प्रभाव
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसह भाजपकडूनही वेगवेगळ्या समाज घटकांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीसाठी आशा बाळगून असलेल्या विविध समाज घटकांतील नेते व समाज संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


भाजपने प्रचारात उतरविले कुणबी समाज नेते 
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कुणबी समाजाचे दोन ते सव्वा दोन लाख मतदार कुणाच्या पारड्यात त्यांचे वजन टाकतात यावर निकालही अवलंबून राहणार आहे. एकीकडे वंचित बहूजन आघाडीने कुणबी समाजातील नेत्याला जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले आहे. काँग्रेसने कुणबी समाजीतील नेत्याला उमेदवारी नाकारली तर भाजपकडून या समाजाला गृहित धरले जात असल्याची भावना नेत्यांमधूनच व्यक्त होत आहे. त्यात वंचित आणि काँग्रेस दोघांनीही कुणबी समाजाला आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याने भाजपने जिल्ह्यातील कुणबी समाजातील नेते व जिल्हाबाहेरील पण अकोल्याशी नाळ जुडली असलेल्या नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरविले आहे. एकेकाळी अकोला लोकसभा मतदारसंघातून तीनवेळी खासदार झालेले भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आमदार आकाश फुंडकर यांनी अनूप धोत्रे यांच्यासोबत जिल्ह्यातील अकोटसह विविध ठिकाणी सभा घेवून भाजपपासून कुणबी समाज दुरावणार नाही याचा प्रयत्न केला जात आहे.  

अशी आहे सामाजिक स्थिती 

  • मराठा-कुणबी - ४८ टक्के
  • मुस्लीम - १६ टक्के
  • दलित - १५ टक्के
  • ओबीसी व इतर- ११ टक्के
  • माळी- १० टक्के

२०१४ च्या विधानसभा मतदारसंघातीत पक्ष निहाय मतदान
मतदारसंघ    भाजप   शिवसेना     काँग्रेस     भारिप    राकाॅ.     
अकाेट          ७००८६  १४०२४       ३८६७५    ३२३५०    ३२००
बाळापूर        ३०७४१   १६७२२      ३४४८७    ४१४२६    ७९१९
अकाेला (प.)  ६६९३४   १०५७२     ९१६४       २३९२७    २६९८१
अकाेला (पू.)  ५३६७८  ३५५१४    ९५४२       ५१२३८    ६०८८
मूर्तिजापूर    ५४२२६    २४४८६    १८०४४     ४१३३८    ७५२०

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com