अकोल्यात भाजपमधले मतभेद उफाळले, महापौरांवर स्वपक्षीयांचीच तीव्र टीका

अकोल्यात भाजपमधले मतभेद उफाळले, महापौरांवर स्वपक्षीयांचीच तीव्र टीका

अकोला : गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. महापालिकेच्या सत्तासंघर्षात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याचे नेहमीच पहावयास मिळते.

मात्र, सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी आपल्याच पक्षाच्या महापौर विजय अग्रवाल यांच्यावर सभागृहात थेट शाब्दीक हल्ला चढवित कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हमारे भरोसे महापौर बने है तुम ! इथपर्यंत हा वाद आता पोहचला असल्याने भाजपमधील अंतर्गत शीतयुद्ध अंतिम टोकाला गेला आहे. 

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये गत काही वर्षांपासून श्रेयवादाच्या लढाईचे राजकारण सुरू आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील विरुद्ध खासदार संजय धोत्रे यांच्यातील कुरघोडीचे राजकारण अनेकदा जिल्हावासियांनी अनुभवले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये निर्माण झालेली मनभेदाची दरी आता खालपर्यंत पोहचल्याचे दिसून येते.

महापालिकेच्या इतिहासात कधी नव्हे येवढे भरीव कामगिरी भाजपने केली. ऐंशी पैकी अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करत खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी महापालिकेच्या राजकारणावर आपला दबदबा दाखवून दिला. 

केंद्र व राज्यात सत्ताधारी असल्याने अकोला शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मतदारांनी भाजपलाच मतांचे भरभरून दान देत महापालिकेची एकहाती सत्ता भाजपच्या ताब्यात दिली. मात्र, सत्ता मिळाल्यावर पदासाठी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये सुरू असलेली कुरघोडीचे राजकारण शमण्याचे नाव घेत नाही आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदाच्या शर्यतीत असलेल्या नगरसेवकांकडून आता आपल्याच पक्षाच्या महापौरांना कोंडीत पकडण्यात येत आहे.

प्रभागातील समस्या सोडविण्यास प्रशासन आणि महापौर अपयशी ठरत असल्याचा हल्लाबोल भाजपचे नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, सतिश ढगे यांच्यासह अनेक नगरसेवकांकडून सभांमध्ये करण्यात येत आहे. महापौर विजय अग्रवाल हे सुद्धा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना समस्यांवर सभागृहात बोलू देत नसल्याचे वास्तव आहे. 

आधी ठराव मंजुर करा मग चर्चा करा, ही महापौर अग्रवाल यांची खेळी भाजपच्याच नगरसेवकांना न रुचणारी आहे. त्यातून कालच्या सभेतील वाद टोकावर गेल्याचे पहावयास मिळाले.

हमारे भरोसे महापौर बने है तुम ही नगरसेवक अजय शर्मा यांची कोपरखळी महापौर अग्रवाल यांना डिवचणारी ठरली. भाजपसह सर्व नगरसेवकांच्या समस्यांवर सभागृहात चर्चा करा, अशी मागणी करत कॉंग्रेसचे विरोध पक्ष नेते साजिद खान पठाण आणि शिवसेनेचे गटनेता मनोज मिश्रा यांनी सुद्धा महापौरांना कात्रीत पकडले. त्यामुळे विरोधी पक्षासह महापालिकेत सत्ताधारी भाजपमध्येच सुरू असलेला सत्तासंघर्ष आता कोणत्या टोकावर जाईल? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

आम्ही भाजपचे आहो तुमचे नाही 
नगरसेवकांना सभागृहात समस्यांवर बोलू दिल्या जात नसून तुम्हारे नगरसेवक तुमसे खुश नही है अशी टीका कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी महापौर अग्रवाल यांच्यावर केली. त्यावर जे खुश नाहीत त्यांना तुमच्या सोबत घ्या, असे महापौरांनी उत्तर दिल्यावर भाजपचे नगरसेवक विजय इंगळे, अजय शर्मा यांच्यासह अनेक नगरसेवकांनी महापौरांचाच समाचार घेतला. आम्ही भाजपचे आहो, तुमचे नाही असा हल्लाबोल करीत भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना घरचा अहेर दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com