akola congress party | Sarkarnama

अकोल्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांना हवे युवा नेतृत्व

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

यावेळी राजेशकुमार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी वयक्तीक चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली. त्यातील अनेकांनी पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी नेतृत्व बदलास अनुकूलता दर्शवली. तर काहींनी जातीय समीकरणे मांडत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाची धुरा सक्षम नेतृत्वाकडे देण्याची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अकोला : कॉंग्रेसला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर सक्षम युवा नेतृत्वाकडे पक्षाची धुरा देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पक्षातंर्गत संघटनात्मक निवडणूक घ्या अथवा थेट नियुक्ती करा, अशी भुमिका कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी असलेले बिहारचे आमदार राजेशकुमार यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यामुळे नेतृत्व बदलाच्या मागणीला मिळत असलेला जोर लक्षात घेता पक्षाची युवा नेतृत्वाकडे धुरा जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शहर व ग्रामीण कॉंग्रेस कमिटीच्या नेतृत्व बदलाच्या मोहिमेला पुन्हा वेग आला आहे. 

जिल्हा निवडणुक निरिक्षक असलेले बिहारचे आमदार राजेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता.26) व बुधवारी (ता.27) झालेल्या बैठकीत महानगराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदावरून वादळी चर्चा झाली. या बैठकीत महानगराध्यक्ष पदासाठी राजेश भारती तर जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रकाश तायडे या नव्या दमाच्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्यामुळे दुसऱ्या गटात अस्वस्थता पसरली आहे. बुधवारी आमदार राजेशकुमार यांनी स्वराज्य भवनात ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 

यावेळी माजी मंत्री अजहर हुसेन, सुधाकरराव गणगणे, प्रदेश महासचिव मदन भरगड, माजी आमदार नतीकोद्दीन खतीब, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, युवा नेते प्रकाश तायडे, राजेश भारती, अकोला लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, नगरसेवक डॉ. झिशान हुसेन, पराग कांबळे, महिला आघाडीच्या नेत्या डॉ. संजीवनीताई बिहाडे, जिल्हाध्यक्ष साधनाताई गावंडे, डॉ. स्वाती देशमुख, विभा राऊत, हेंमत देशमुख, कपील रावदेव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी राजेशकुमार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी वयक्तीक चर्चा करीत त्यांची मते जाणून घेतली. त्यातील अनेकांनी पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी नेतृत्व बदलास अनुकूलता दर्शवली. तर काहींनी जातीय समीकरणे मांडत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाची धुरा सक्षम नेतृत्वाकडे देण्याची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन दिवसांपासून कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकासंदर्भात सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांमध्ये नेतृत्व बदलाची मागणी जोर धरत असल्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन तसा अहवाल जिल्हा निवडणुक अधिकारी असलेले आमदार राजेशकुमार पक्ष नेतृत्वाकडे देणार आहेत. 
 

संबंधित लेख