Akola Collector Cleaned the Wall of Government office | Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांनी साफ केल्या सरकारी कार्यालयातल्या पानाच्या पिचकाऱ्या

विवेक मेतकर
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. पाहणी दरम्यान, कार्यकारी अभियंता कार्यालयाला लागूनच असलेली भिंत पानाच्या पिचकाऱ्यानी रंगलेली दिसताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तिथे थांबले.

अकोला : शेवटचा श्रावणी सोमवार...शहरात सर्वत्र कावड यात्रेची धूम... मात्र, अकोल्याचे जिल्हाधिकारी निघाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेण्यासाठी. कार्यालयातील भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले कोपरे बघून  ते थक्क झाले. कुणालाही आदेश न देता चक्क जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी रंगलेल्या भिंती साफ साफ करून गांधीगिरीचा परिचय करून तर दिला. 

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, मंडळ अधिकारी भगवान थिटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत  जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करीत, कामकाजाची माहिती घेतली. 

पाहणी दरम्यान, कार्यकारी अभियंता कार्यालयाला लागूनच असलेली भिंत पानाच्या पिचकाऱ्यानी रंगलेली दिसताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तिथे थांबले. कार्यालयातील कर्मचाऱ्याला बादली, पाणी व कापड घेऊन बोलावले आणि बादलीतील पाणी व कापडाने, स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पानाच्या पिचकाऱ्या व थुंकींनी रंगलेली भिंत स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. कार्यालयातील भिंत स्वत: जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तेथे जमले व आश्चर्यचकित झाले. 

काम थांबविण्याची विनंती
कार्यालयातील भिंत जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता कार्यालयातील एका महिलेने ‘साहेब, राहू द्या, आम्ही भिंत साफ करतो’ असे म्हणत भिंत साफ करण्याचे काम थांबविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली. त्या महिला कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी भिंत साफ करण्याचे काम थांबविले.

अधिकारी झाले खजील
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता केल्याने अधिकारी, कर्मचारी पुरते खजील झाले.  यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांना कानपिचक्या देत, दोन दिवसात कार्यालयातील साफसफाई करण्याचे निर्देशही दिले.

संबंधित लेख