akola collector | Sarkarnama

बॉलिवूडचा हिरो नव्हे, हे तर अकोल्याचे जिल्हाधिकारी !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 जुलै 2017

सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने 1 ते 31 जूलै दरम्यान 18 ते 21 वर्षाच्या तरूण मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे

अकोला : सकाळी 11 ची वेळ. अशोक वाटिका चौकात सिग्नलवर अनेक वाहनचालकांचे लक्ष अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या भल्यामोठ्या पोस्टरवर गेले. जांभळ्या रंगाची सफारी व जांभळ्याच रंगाचा गॉगल घातलेली व्यक्ती व इंग्रजीत 6 असे लिहिलेले दिसून आले. फॉर्म नं. 6 नावाचा मराठी चित्रपट असून साऊथचा हिरो त्यात असल्याची चर्चा त्यानिमित्ताने लगेच सुरू होते, तेवढ्यात कुणीतरी बोलले, अहो, भाऊ ते जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आहेत. मतदार नोंदणीचे युवा वर्गाला ते आवाहन करीत आहेत. 

सध्या निवडणूक आयोगाच्या वतीने 1 ते 31 जूलै दरम्यान 18 ते 21 वर्षाच्या तरूण मतदारांचा समावेश मतदार यादीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तरूण व पात्र प्रथम मतदारांचे नाव नोंदवून घेण्यासाठी संबधीतांचे अर्ज प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने स्विकारणे, नमुना क्रमांक 6 बीएलओ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी भेटी देवून गोळा करणे व मोबाईल वापर करून नाव नोंदणी करणे आदी कामे जोमाने सुरू आहेत.

नव्याने सैन्यात भरती झालेले युवक, दिव्यांग पण वयाची 18 वर्षे पुर्ण केलेले मतदार यांचा शोध घेवून त्यांच्या नावाची नोंदणी करण्याचे कामही बीएलओंच्या मदतीने सुरू आहे. शासनाच्या मोहिमेची आकर्षीत करणारी जाहिरात करणारे कलरफूल पोस्टरवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय झळकत आहेत. नेहमीच्या लुकपेक्षा त्यांचा पोस्टरवरील लूक थोडा हटके असल्याने सर्वांनाच आकर्षित करीत आहे. 

काय आहे फॉर्म नं. 6 
18 वर्षे पूर्ण असलेला कोणताही युवक वा युवती मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी अर्ज करू शकते. प्रत्यक्ष वा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धती आहेत. मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेण्यासाठी फॉर्म नं. 6 भरून जवळच्या मतदान केंद्रावरील बीएलओ यांच्याकडे किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक कक्षात जमा करावा. 

वेबसाईटला भेट द्या 
निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन नावाची नोंदणी करता येवू शकते. संपुर्ण तपशिल भरल्यानंतर आपोआप संबधीत युवक/युवतीचा अर्ज निवडणूक आयोगाकडे जमा होतो. 

 

संबंधित लेख