ajitdada praise ashok chavhan | Sarkarnama

अजितदादांनी केली अशोक चव्हाणांची स्तुती! 

सरकारनामा ब्युराे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नागपूर : नांदेड महापालिका निवडणुकीतील यशाने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नेतृत्व आणखी मजबूत झाले, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्तुती केली. शिवसेनेच्या मुखपत्रातही अशोक चव्हाण यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्यानंतर अजितदादांनी केलेल्या या स्तुतीला राजकीय रंग मिळाला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नागपुरात आले होते. नागपूर प्रेस क्‍लबने आयोजित केलेल्या "मिट दी प्रेस' कार्यक्रमात बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांची मुक्तकंठाने स्तुती केली. नांदेड महापालिकेत कॉंग्रेसला मिळालेल्या यशानंतर भाजपच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात झाल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचे अजितदादांनी समर्थन केले व राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीही भाजपसोबत नव्हती व राहणार नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली. 

नांदेडच्या निकालानंतर शिवसेनेच्या मुखपत्रात अशोक चव्हाण यांची स्तुती केली. विशेष म्हणजे नांदेड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. गेल्या तीन वर्षात भाजपच्या यशाचा आलेख चढता होता. हा आलेख नांदेडमध्ये खाली आला. नेतृत्वाचा समर्थ पर्याय मिळाल्यास भाजपला भूईसपाट करता येते, हे नांदेड निकालाने स्पष्ट झाल्याचे अजितदादांनी सांगितले. आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत अजितदादांचे मतभेद होते. पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर उघड टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांच्याबद्दल "सॉफ्ट कॉर्नर' दाखवून अजितदादांनी पुढील राजकीय समीकरणाचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित लेख