ajitdada cm candidate | Sarkarnama

अजितदादा सीएमपदाचे उमेदवार!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 जुलै 2017

विविध आरोपांचा सामना करत असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना युवक आघाडीने मात्र मोठी झेप घेण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणून अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते व त्यांची टीम त्यादृष्टीकोनातून राज्यभरात बांधणी करत आहे. 

नगर :  विविध आरोपांचा सामना करत असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना युवक आघाडीने मात्र मोठी झेप घेण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणून अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते व त्यांची टीम त्यादृष्टीकोनातून राज्यभरात बांधणी करत आहे. 

संग्राम कोते यांनी "सरकारनामा'शी बोलताना आगामी काळातील नियोजन स्पष्ट केले. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे केले. आंदोलने उभारली. प्रत्येक क्षेत्रात सरकारकडून युवकांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून आले. भाजप सरकारने केलेल्या रोजगाराच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. योजनांचा, घोषणांचा नुसताच पाऊस सुरू आहे. मग पाणी कुठे मुरते ते कळत नाही. लोकांच्या हाती काहीच मिळत नाही. युवकांमधील बेरोजगारी वाढली आहे. हे सरकार फक्त स्वतःचे मार्केंटिंग करून चमकोगिरी करीत आहे. मोठ्या बाता करताना सर्वसामान्यांच्या पदरी काहीच पडत नाही, असे कोते म्हणाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युवकांना संधी देण्यात येत आहे. राज्यभरातील तीन लाख नवीन कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जोडले जाणार आहेत. गाव तेथे शाखा, प्रभाग तेथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची शाखा स्थापन करून राज्यभरात सुमारे पाच हजार राष्ट्रवादीच्या शाखा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात 27 जुलैपासून करणार आहोत. त्यासाठी शंभर दिवसांचा दौरा नियोजन केला आहे. त्यामुळे आगामी काळात युवकांची फौज तयार करून सरकारला जाब विचारणार आहोत, असे कोते म्हणाले. 

संबंधित लेख