Ajit Pawar's grand welcome by rival Kakade | Sarkarnama

कट्टर विरोधक असलेल्या काकडेंनी काढली अजित पवारांची जंगी मिरवणूक 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 डिसेंबर 2018

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निंबुत (ता. बारामती) या काकडे गटाच्या बालेकिल्ल्यात मिरवणूक काढून जंगी स्वागत झाले. उघड्या जिप्सीला प्रमोद काकडे चालक होते तर जिप्सीत सतीश काकडे व शहाजी काकडे पवारांसोबत उभे होते. काकडे-पवार या पन्नास वर्षांतील कट्टर विरोधकांचे मनोमीलन पहायला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

सोमेश्वरनगर : तुतारीची... हलगीचा उंच स्वर... लेझीमचा ताल... रांगोळी आणि फुलांचा सडा या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निंबुत (ता. बारामती) या काकडे गटाच्या बालेकिल्ल्यात मिरवणूक काढून जंगी स्वागत झाले. 

उघड्या जिप्सीला प्रमोद काकडे चालक होते तर जिप्सीत सतीश काकडे व शहाजी काकडे पवारांसोबत उभे होते. काकडे-पवार या पन्नास वर्षांतील कट्टर विरोधकांचे मनोमीलन पहायला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या 1967 च्या पहिल्या निवडणुकीपासून पवार-काकडे या गटातील राजकीय वादाला सुरुवात झाली. यानंतर सगळ्याच निवडणूकांमधे दोघांत लढती झाल्या. 

अजित पवार राजकारणात आल्यानंतर शेतकरी कृती समितीकडून सतीश काकडे यांना कारखाना व जिल्हा परिषद गटात कायम कडवी लढत दिली. मात्र 2016 च्या जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीकडून प्रमोद काकडे उभे राहिल्याने सतीश काकडे यांनी तलवार म्यान केली. त्यानंतर त्यांच्या पवारांशी वाढत गेलेल्या जवळकीचा परिणाम म्हणून अजित पवार आज वीस वर्षांनी निंबुत गावात कार्यक्रमासाठी आले होते. 

तब्बल सोळा उद्घाटने पवार यांनी केली. आकर्षण होते ते जिप्सीतून मिरवणुकीचे. प्रमोद काकडे यांनी सारथ्य केले. 

सतीश काकडे पवारांशेजारी उभे होते. त्यांच्यासोबत अजित पवारांपासून 2015 च्या कारखाना निवडणुकीत दुरावलेले सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडेही होते. त्यांचीही यानिमित्ताने राष्ट्रवादीत घरवापसी अधोरेखित झाली. 

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रमात अजित पवार यांना सन्मानपत्र देऊन बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील, लालबहादूर शास्त्री अशा दिग्गजांची उपमा पवार यांना देण्यात आल्या. तसेच चांदीची तलवार भेट देऊन जणू यापुढे शाब्दिक तलवारी एकमेकांवर चालवायच्या नाहीत असेच सूचीत करण्यात आले. 

सध्या सतीश काकडे यांनी कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी पवार यांच्याशी झालेल्या जाहीर सलगीने बारामती व पुरंदरच्या राजकारणाची सूत्रे बदलणार अशीच चर्चा होती.

याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते म्हणाले, की हा पक्षीय विषय नाही. विकासकामांच्या माध्यमातून कट्टर विरोधकही जवळ येऊ शकतो हे अजितदादांनी सिद्ध केले आहे. निंबुतकरांनीही जोरदार स्वागत करून त्यांना प्रतिसाद दिला आहे. विकासासाठी राजकारण नको एवढेच सांगायचे आहे.

संबंधित लेख