Ajit Pawar will lead in anti govt agitation in Pune | Sarkarnama

अजित पवार उतरणार पुण्यातील रस्त्यांवर ! 

मंगेश कोळपकर
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

इंधन दरवाढ, गॅसची दरवाढ, जीएसटीमुळे झालेली महागाई, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी, महिलावरील अत्याचारांत होत असलेली वाढ, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार आणि होत असलेली कारवाई आदी विविध मुद्‌द्‌यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणेकरांमध्ये जागरूकता निर्माण करणार आहे. 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध पुणे शहरात एल्गार पुकारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. 29 सप्टेंबर) भव्य फेरी काढून मोदी सरकारविरुद्ध वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध सेल आणि आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या दुष्कृत्यांची माहिती देण्यासाठी आठ विधानसभा मतदारसंघातून पक्षातर्फे चित्ररथ तयार करण्यात येणार आहेत. हे चित्ररथही या फेरीत दिसणार आहेत. 

 

शहराध्यक्ष आणि खासदार ऍड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली त्यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. नेटके नियोजन आणि अंमलबजावणीसाठी सातत्याने बैठकाही घेण्यात येत आहे. मोर्चात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील, यासाठी आठही विधानसभा मतदारसंघांतील पक्षाचे अध्यक्षही सध्या झटत आहेत. त्यांच्या स्तरावरही बैठका, मेळावे यांना वेग आला आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे गटनेते चेतन तुपे यांच्यामार्फतही नगरसेवक, माजी नगरसेवकांपर्यंत या आंदोलनाचे निरोप पोचविण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील विषयांबरोबरच राज्यातील भाजप सरकारच्या अपयशाचाही भांडाफोड या फेरीत होणार आहे. 

या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहरात शक्तीप्रदर्शनच होणार आहे. बाजीराव रस्त्यावरील अभिनव महाविद्यालय चौकातून शुक्रवारी दुपारी तीन वाजता फेरीला प्रारंभ होणार आहे. बाजीराव रस्त्याने फेरी येऊन शनिवारवाड्याच्या पटागणांवर फेरीचा समारोप होणार आहे, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या फेरीसाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्या दिवशी दुपारी अडीच वाजताची वेळ दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दसऱ्याच्या आदल्या दिवशी होणारी ही फेरी म्हणजे शक्तीप्रदर्शन असल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्साहाने त्यासाठी झटत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 
 

संबंधित लेख