Ajit Pawar visits after 5 months to PCMC | Sarkarnama

अजितदादांना पाच महिन्यानंतर सापडली पिंपरी-चिंचवडची वाट 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 जून 2017

राष्ट्रवादी काॅंग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता असताना अजित पवार हे दर पाच दिवसांनी या शहरात यायचे. महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी या शहराचे नावच टाकले. त्यांनी पालिका निवडणूक प्रचारात भाग घेतला. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर ते आता पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जुलै रोजी येणार आहेत.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे तब्बल पाच महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीर कार्यक्रमासाठी येणार आहेत. पुणे शहरातही ते बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादीच्या संघटनेच्या पातळीवर लक्ष घालण्यासाठी पाच जुलै रोजी पुण्यात बैठका घेणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जुलै रोजी राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा फेब्रुवारी महिन्यात पराभव झाला. त्यातही पिंपरी-चिंचवडचा पराभव त्यांच्या जास्त जिव्हारी लागला. तेव्हापासून ते पिंपरी-चिंचवडमध्ये फिरकले देखील नाहीत. दोन-चार प्रमुख कार्यकर्ते सोडले तर इतरांशी त्यांनी फारसा संपर्क ठेवला नाही. अजित पवार शहरात न येणे, हा चर्चेचा विषय पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. 
आता मात्र पराभवाच्या छायेतून पवार बाहेर ते राज्यभर दौऱ्यासाठी फिरत आहेत. मराठवाड्याचा त्यांचा दौरा नुकताच संपला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अजित पवार हे दोघे येत्या शुक्रवारपासून (ता. 30 जून) कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौरा सुरू करणात आहे. सलग पंधरा दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात सभा आणि बैठका घेणार आहेत. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शहर संघटना सध्या शिथिल झाली आहे. महापालिकेतील पराभवानंतर पुण्याच्या शहराध्यक्षा वंदान चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर ही जबाबदारी कोणी स्वीकारणा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पक्षाची सत्ता गेल्याने संघटनेलाही आर्थिक चणचण जाणवत असल्याचे कार्यकर्ते बोलतात. शहराध्यक्ष पद मिळाल्यानंतर विविध कार्यक्रम, सभा यासाठीचा खर्च कसा भागवायचा, या चिंतेतूनच अनेकांनी या पदाला नकार दिल्याचे सांगण्यात येते. पक्षाच्या युवक आघाडीत मोठ्या प्रमाणात वाद आहेत. या वादांकडे सत्ता असताना दुर्लक्ष झाले. या दौऱ्याच्या निमित्ताने अशा बाबींवर तोडगा निघणे अपेक्षित आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये तर पक्षाला कोणीच वाली नसल्याचे चित्र आहे. पक्षाची वाताहात होऊनही विशिष्ट मंडळींनाच वारंवार पदे दिली जातात, असा जुनाच आरोप होत आहे. पक्षातील बहुतांश मंडळी भाजपमध्ये गेल्याने कार्यकर्त्यांचीही वाणवा राष्ट्रवादीला पहिल्यांदाच जाणवत आहे. ग्रामीण भागातील संघटनेतही विविध तालुक्‍यांत सध्या वाद आहेत. त्यावर पवार काय बोलणार, याकडे लक्ष आहे. 

त्यांच्या दौऱ्याचा 30 जूनपासून सिंधुदुर्गपासून होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, पिंपरी-चिचंवड, नगर असा दौरा असणार आहे. नगरनंतर ते कल्याण, नवी मुंबईत बैठका घेतील. नऊ जुलै रोजी नवी मुंबईतील बैठक झाल्यानंतर थेट 13 जुलैपासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू होईल. जळगाव, नंदुरबार, धुळे, मालेगाव या ठिकाणी दोघे बैठका घेतील. सर्वात शेवटी पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या आढाव्यानंतर हा दौरा संपेल. 

संबंधित लेख