Ajit pawar snubs baramati corporetors | Sarkarnama

मी राज्याचे काम करू की नको : अजित पवारांचा बारामतीच्या नगरसेवकांना सवाल

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 20 जून 2017

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे नेते असले तरी त्यांचे आपल्या बारामती मतदारसंघावर बारीक लक्ष असते. तरीही बारामतीची मंडळी त्यांना कधी कधी स्थानिक प्रश्नांतच इतके गुंतवून ठेवतात की, त्यांना इतरत्र लक्ष द्यायला कमी वेळ मिळतो. त्याचाच त्रागा त्यांनी व्यक्त केला.

बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील नगरसेवकांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. सुमारे 64 विषयांची पत्रिका पाहून "मी राज्याचे काम करू की नको' असा प्रश्‍न उपस्थित करून इतके विषय एकाच बैठकीला का घेतले, याचे स्पष्टीकरण त्यांनी मागितले. 

"नगरपालिकेचा नावलौकिक उंचाविण्यासाठी नगरसेवक आणि प्रशासनाने संयुक्तपणे काम करावे,'' अशी सूचनाही त्यांनी दिली. नगरपालिकेच्या सभेअगोदर पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेण्याची प्रथा अजित पवार यांनी सुरू केली आहे. या बैठकीत 64 विषयांची भली मोठी पत्रिका पाहून त्यांनी "मी राज्याचे काम करू की नको' असा सवाल करून इतके विषय एकाच बैठकीला का घेतले, याचे स्पष्टीकरण मागितले.

इतक्‍या विकासकामांसाठी नगरपालिकेकडे आर्थिक तरतूद आहे की नाही? हे न पाहताच इतक्‍या कामांचा समावेश का केला, अशी विचारणा त्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे केली. नगरसेवकांच्या आग्रहामुळे प्रत्येक नगरसेवकाचे दोन-चार विषय विषयपत्रिकेत समाविष्ट केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर आगामी काळात नगरसेवकांच्या आग्रहासाठी नाही, तर प्राधान्यक्रमानुसारच विकासकामे घेण्याची तंबी त्यांनी दिली. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि त्यानंतर रस्त्यांची कामे यानुसारच विकासकामांचा प्राधान्यक्रम असेल, असे त्यांनी सुनावले. 

नगरसेवकांमध्ये तीन गट निर्माण झाल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केल्यावर बारामतीकरांनी पक्षावर विश्वास टाकत बहुमत दिले आहे, शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. गटातटाचे राजकारण अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सुनावले. 

डुक्कर पकडण्यासह व्हिडिओ चित्रीकरणाच्या बिलासंदर्भातही अजित पवारांनी माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली. काही नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त करत अनेक कामांत भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. याबाबतही मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी तातडीने परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सुचविले. 

मुख्याधिकाऱ्यांकडून अपेक्षा

नूतन मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी यापूर्वी चांगले काम केल्याचा दाखला देत अजित पवार यांनी त्यांच्याकडून कामाच्या अपेक्षा असल्याचे सांगितले. मागील मुख्याधिकाऱ्यांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने नगरपालिकेचा नावलौकिक वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासन व नगरसेवकांत समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी चितळे यांना दिल्या. 

संबंधित लेख