ajit pawar at navi mumbai | Sarkarnama

पोलिस बळ वापरले तर गप्प बसणार नाही : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 जुलै 2017

शेतकऱ्यांवर पोलिसांच्या दंडूक्‍याचा मारा करून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

नवी मुंबई: समृद्धी महामार्गाबाबत सरकारने जाहीर केलेल्या दराबाबत शेतकरी समाधानी नाही. ज्या भागाचा विकास झाला नाही तेथील शेतकरी कदाचित सरकारचे दर मान्य करेल परंतु ज्या भागात विकास झालेला आहे, तेथील शेतकरी सरकारचा दर मान्य करेल, असे मला वाटत नाही. याविषयात शेतकऱ्यांवर पोलिसांच्या दंडूक्‍याचा मारा करून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पवार म्हणाले, हे सरकार कधीपासून कर्जमाफीवर अभ्यास करतंय असे सांगत आहे. यांच्या मागून उत्तरप्रदेशमध्ये योगी अदित्यनाथांची सत्ता आली. त्यांनी लगेच कर्जमाफी करून देखील टाकली. हे मात्र अभ्यास करायचा आहे असं बोलत बसलेत. भगवे कपडे घालणाऱ्याला अभ्यासाची गरज वाटली नाही, मग जॅकेट घालणाऱ्याला अभ्यासाची गरज का वाटते हे मला कळत नाही. याचा जाब येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला विचारणार आहे. 

भाजप सरकार आल्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. मेक इन इंडीया राबवले मात्र किती गुंतवणूक आली याचे आकडेवारी कोण सांगणार? परदेशातून काळा पैसा आणता आला नाही. देशातील काळा पैसा गोळा केला त्याची आकडेवारी सांगत नाहीत. भाजप सरकार हे जातीयवादी सरकार आहे. युपीत सर्वात जास्त जागा निवडून येऊन देखील एकाही अल्पसंख्याकाला मंत्री पद दिलेले नाही, अशी टीका पवार यांनी केली. 

सुनील तटकरे म्हणाले, जकात रद्द झाल्याने नुकसान भरपाईचे पैसे देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षप्रमुखांच्या उपस्थित देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत "चोर चोर' अशी घोषणाबाजी केली. त्याची आम्ही निंदा करतो. कितीही वैचारीक मतभेद असले तरी सर्वोच्च पदाच्या व्यक्तीबाबत आपण काय बोलले पाहिजे याचे संस्कार शिवसेनेच्या नगरसेवकांवर नाहीत. सहिष्णूता, विचार व संस्कृती दाखवण्याची गरज होती. कंबरेखालचे वार करण्याचा धडा कधीच राष्ट्रवादीने त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेली नाही. जेव्हा कधीही निवडणूका येतील तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निवडणुकीसाठी सज्ज आहे. 

संबंधित लेख