ajit pawar jamkhed assembly saet issue | Sarkarnama

कर्जत- जामखेडमधील अजित पवारांची तलवार म्यान? 

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार करायचा, असा चंग नेत्यांनी बांधला आहे.

नगर : जामखेड विधानसभा मतदारसंघातून आघाडीकडून कोण लढणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले जात होते. त्यांचे दौरेही वाढले होते. मात्र त्यांनी तलवार म्यान केलेली दिसते. त्यामुळे आता पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शह देण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा बॅंकेच्या संचालिका मिनाक्षी साळुंके किंवा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांना पुढे केले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार करायचा, असा चंग नेत्यांनी बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपद या मतदारसंघात राजेंद्र फाळके यांना दिल्याचे सांगण्यात येते. तसेच याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपदही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या रुपाने आहे.  

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीत ही जागा कोणाला द्यायची, यापेक्षा भाजपच्या प्रा. शिंदे यांना टक्कर देतील, असा उमेदवार निवडण्याचे घाटत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून मिनाक्षी साळुंके किंवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीकडून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरे दावेदार म्हणून राजेंद्र फाळके यांच्याकडे पाहिले जात होते तथापि, त्यांना जिल्हाध्यक्षपद नुकतेच दिले असल्याने त्यांना पुन्हा ही संधी मिळण्याची शक्यता नाही.

दरम्यान, साळुंके, गुंड यांच्याकडून विधानसभा लढण्याची तयारी सुरू आहे. मात्र नावावर शिक्कामोर्तब केव्हा होते, याचीच वाट पाहत आहेत. साळुंके माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. उमेदवारीसाठी त्यांना पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता नाही. विखे गटाकडून विरोध होण्याची शक्यता असली, तरी सुजय विखे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी केल्यास तो विरोधही मावळला जाईल. राष्ट्रवादीच्या गुंड यांना माजी उपमुख्यमंत्री अजितदादांचाही आर्शीर्वाद आहे.  

संबंधित लेख