ajit pawar on dhananjay mahadik | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

महाडिकांना सर्वांसमोर हार घालू कां ? : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 जुलै 2017

शेतकरी स्वतःहून कर्ज थकवत नाही. त्याला त्याच्या मालातून मिळालेल्या रकमेतून तो घेतलेले कर्ज वेळेत फेड करतो. त्यानंतर त्याला शून्य टक्के व्याजाचा फायदा मिळतो. ज्यावेळी शेतीतून काहीच मिळत नाही. त्याचे उत्पन्न बुडते, कांदा, सोयाबीन मातीमोल किमतीने गेल्याने शेतकऱ्याचे कर्ज थकले आहे; पण वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. 
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

कोल्हापर : राष्ट्रवादीचे खासदार असूनही प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणारे धनंजय महाडिक यांचा विषय अजितदादा पवार यांच्या कौल्हापूर दौऱ्यात आलाच. महाडिक यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याची पक्षाने दखल घेतली नाही, असा प्रश्‍न विचारल्यानंतर श्री. पवार म्हणाले, ""दखल घ्यायची म्हणजे काय करायचे, तुमच्या सारख्यांच्या समोर त्यांचा हार घालून सत्कार करू का? काय करू? आमचे सगळ्यांचे व्यवस्थित आहे,'' असे म्हणत त्यांनी विषय बदलला. 

कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर श्री. पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 

श्री. पवार म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांदा ते बांदापर्यंत संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर अनेक संघटनांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर आसूड यात्रा, शिवार यात्रा, संवाद यात्रा, पदयात्रा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेतल्यामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. पुणतांब्यासारख्या गावातून शेतकऱ्यांनीच संप पुकारला. देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांनी संप केला नव्हता. तो संप भाजप-शिवसेना सत्तेत असताना झाला. सरकारविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला. त्यानंतर कर्जमाफी जाहीर झाली; पण कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करत आहे. त्यांनी हा खेळ न थांबल्यास येत्या अधिवेशनात आवाज उठविला जाईल. ज्यावेळी सरकारला कर्जमाफीचे वास्तव सांगत होतो, त्यावेळी त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही; मात्र त्यांनी अंतर्गत समिती बसविली. त्यांना सर्वच भाजप आमदारांनी कर्जमाफी का गरजेची आहे हे सांगत कर्जमाफी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. सरकार एखादा मुद्दा अंगलट येणार असे दिसल्यानंतर सोयीची भूमिका आणि निर्णय घेत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. यामध्ये एकदा नियम आणि अटी घातल्या होत्या; पण भाजप सरकार रोज आपला नियम आणि निकष बदलत आहे. रोज वेगळा जीआर प्रसिद्ध करत आहे, हे चुकीचे आहे.'' 

 

संबंधित लेख