पापं झाकण्यासाठी काही नेते भाजपत गेले : अजित पवारांचा पक्ष बदलूंवर हल्लाबोल

पापं झाकण्यासाठी काही नेते भाजपत गेले : अजित पवारांचा पक्ष बदलूंवर हल्लाबोल

सोमेश्वरनगर : आपली पापं झाकण्यासाठी लोकं भाजपत गेलेत. गोमूत्र शिंपडल्यावर शुध्द होतं तसं भाजपात गेलं की शुध्द होतं, अशी खिल्ली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडविली.

आधी ज्यांच्या विरोधात सभा घेतली त्याच मोहिते पाटलांचा गौरव पंतप्रधान करतात आणि राज ठाकरेंचं आधी कौतुक करत होते आता त्यांना वाईट म्हणतात. ह्यांच्यासारखं बोललं की चांगला नाहीतर थेट देशद्रोही असे राज्यकर्ते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

करंजेपूल (ता. बारामती) येथे आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, विद्ममान अध्यक्ष विश्वास देवकाते, राजवर्धन शिंदे, संजय भोसले, प्रमोद काकडे, संभाजी होळकर, संग्राम सोरटे, डी. के. पवार, लालासाहेब माळशिकारे, विक्रम भोसले आदी उपस्थित होते.

पवारसाहेबांनी साखर कारखाने खासगी केले असा आरोप मोदींनी केला. मात्र, त्यांचा खासगीशी दुरान्वयेही संबंध नाही. तुमच्याच रणजित निंबाळकर या उमेदवाराचा खासगी कारखाना असून त्याने पेमेंटही केलेले नाही. तावडे, दानवे, गडकरी, मुंडे, खडसे, देशमुख यांचे खासगी कारखाने आहेत. पवारसाहेबांच्या नावाने पावत्या फाडण्यापेक्षा सहकाराला चालना द्या, असे आवाहन अजित पवारांनी केले. तसेच चंद्रकांत पाटील व सदाभाऊ खोत यांना, जरा समोरच्या दारानं या आणि जनतेतून उभं राहून दाखवा, असे आव्हानही अजितदादांनी दिले.  

सध्या दोनच लोकं देश चालवत आहेत. अडवानींना बाजूला केलं. सुमित्रा महाजन, उमा भारती, सुषमा स्वराज तिकीट नको म्हणाल्या. दिलीप गांधी रडले. कुणी हाणामाऱ्या करतंय. संविधान बदलायची हे लोक भाषा करतात. निखिल वागळे, उदय निरगुडकर यांच्यासारखी माध्यमातील लोकं विरोधात बोलली म्हणून गायब झाली. खुद्द पंतप्रधान आधीच्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात बोलले आता त्यांच्या पन्नास वर्षाच्या कार्याचा गौरव करतात. पवारसाहेबांच्या बोटाला धरून शिकलो म्हणणाऱ्या पंतप्रधानांना आता तेही वाईट दिसतात. पंतप्रधानांनीच असं केल्यावर कसं व्हायचं, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.  

या  पंधरा उद्योजकांचे साडेतीन लाख कोटी कर्ज माफ केले आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शकत नाहीत. हेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारीस म्हणतात आणि साले म्हणतात. कालव्याकडेच्या शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. आघाडी सरकार शेतकरी कर्जमाफी करेल, मुलींना नोकऱ्यांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण देईल व शिक्षणासाठी सहा टक्के तरतूद करेल असेही पवार म्हणाले. सतीश काकडे, पुरूषोत्तम जगताप, ऋषी गायकवाड यांची भाषणे झाली. विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर विक्रम भोसले यांनी आभार मानले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com