Ajit Pawar attacks government over farmer's daughter suecide issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शेतकरी कन्येच्या आत्महत्येवरून अजित पवार यांची सरकारवर घणाघाती टीका  

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

अजित पवार यांनी वाचून दाखवलेल्या पत्रातील मजकूर असा  -

"प्रिय पप्पा,

आपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते."
- तुमची सारिका

मुंबई   : " सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण अंमलबजावणी कधी करणार ? आता तर शेतकऱ्यांच्या मुलींच्याही आत्महत्या सुरू झाल्या  आहेत. कर्जमाफी घोषणा असतानाही कोवळ्या मुलींने जीवन संपवले आहे. याला कोणी वाली आहे का नाही ? 

जवळाझुटा (जि. परभणी) इथे कर्जबाजारी व नापिकीमुळे वडिल  आत्महत्या करतील या  भीतीने एका मुलीने आत्महत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. सरकार काय करणार आहे की नाही ? " असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत विचारला.

अजित पवार म्हणाले, " बारावीत शिकत असलेल्या सारिका झुटे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून काही दिवसांपुर्वीच कर्जबाजारीपण व नापिकीने तिचे  काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. पाऊस नसल्यामुळे पीक वाळून जात असल्याने कर्जबाजारीपणामुळे काकांप्रमाणे   वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती. त्यामुळे त्याआधीच तिने आपले जिवन संपवले. आत्महत्या करण्यापुर्वी सारिकाने लिहलेली सुसाईड नोट वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल किती गंभिर प्रकार आहे. " 

पत्र वाचून पुढे  बोलताना अजित पवार म्हणाले, " सरकारने यावर गंभिरपणे पावले उचलेले पाहिजे, पण सरकार काहीही करत नसल्याने आपण त्यांना आदेश द्यावे अशी मागणा पवार यांनी अध्यक्षांकडे केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, " या आत्महत्याची जबाबदारी कोण घेणार ? सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहे, यावरून लोकांचा सरकारवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होते आहे."

" विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक फी माफीची घोषणा सरकारने केली. मात्र, त्यांनाही मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढावे लागत आहेत. राज्यातील किती शेतकऱ्यांनी विमा भरला ? त्याची माहिती द्या.किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीची फार्म भरला याची माहिती द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली.

संबंधित लेख