ajit pawar about sujay vikhe | Sarkarnama

सुजयला माझ्या समोर आणा: अजित पवार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 मार्च 2019

सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार बोलतात ते खरच बोलतात

पुणे : ''सुजय विखे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो, मात्र सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे,'' असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

सुजय यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे असे त्यांना मी स्वत: सांगितले होते पण त्यांनीच या प्रस्तावाला नकार दिल्याने आमचाही नाईलाज झाला, असे पवार म्हणाले. 

शरद पवार हे पन्नास वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. त्यांनी माढ्यातून माघार घेतली कारण राज्यसभेची मुदत 2020 पर्यंत आहे ती जागा विनाकारणच इतरांना द्यावी लागली असती. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असेही पवार म्हणाले. 

हवेचा रोख बघून शरद पवारांनी माघार घेतल्याचा आरोप निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. ज्यांच्या नावावर अनेक जण निवडून येतात, त्यांच्या बाबत असे विधान करणे चुकीचे आहे. 
दरम्यान माढ्याच्या जागेबाबत एक दिवसात अंतिम निर्णय होईल व सर्वांना मान्य होईल असाच उमेदवार तेथून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. माढ्याबाबत चिंता करण्याची गरज नाही असे ते म्हणाले.

शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांसह मावळ भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरला होता, या सर्वांच्या भावनांचा आदर करुनच पार्थ पवार यांना उमेदवारी दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.  राष्ट्रवादीला सर्वत्र वातावरण अनुकूल आहे, त्या मुळे या निवडणूकीत आघाडीला निश्चितपणे चांगल्या जागा मिळतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 

संबंधित लेख