समृद्धी उध्वस्त करणारा महामार्ग: अजित पवार

 समृद्धी उध्वस्त करणारा महामार्ग: अजित पवार

शहापूर (जि.ठाणे) : सरकारने घाट घातलेला समृद्धी महामार्ग हा विकासाचा नव्हे तर या भागातील हजारो शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आ.अजित पवार यांनी आज संघर्षयात्रे दरम्यान शहापूर-चेरपुली येथील जाहीरसभेत केली. 


राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शहापूर तालुक्‍यातील चेरपुली या गावी समारोप करण्यात आला. 

यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर चौफेर टीका करताना अजित पवार म्हणाले, की मुंबई- नागपूर या दोन्ही शहरांदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या सातशे किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे शहापूर, इगतपुरी, सिन्नर, कोपरगाव या भागातील सुपीक व बागायती जमीन येथील शेतकऱ्यांना गमवाव्या लागणार आहेत. मुंबई ते नागपूर प्रवासासाठी जलद विमानसेवा, रेल्वे सेवा उपलब्ध असताना तसेच वाहतुकीसाठी सध्याचा मार्ग ज्याचे विस्तारीकरण करून वाहतुकीसाठी उपलब्ध करता येत असताना नव्या महामार्गाचा घाट नेमका कोणाची समृद्धी करण्यासाठी आहे ? 

एकीकडे सरकार तिजोरीत पैसा नसल्याचे कारण सांगते त्याच वेळी समृद्धी महामार्गासाठी हजार कोटी रुपये, मुंबई- अहमदाबाद या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी लाख कोटी, बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी केंद्र सरकार लाख हजार कोटींवर पाणी सोडते त्याच वेळी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करीत असलेल्या व अडचणीत सापडलेल्या आमच्या शेतकऱ्यांचे हजार कोटी रुपये कर्ज माफ करण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सरकार सांगत आहे ही बाब दुर्दैवी आहे. 

अजित पवार पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी चांदा ते बांदा सुरु केलेला हा संघर्ष इथेच थांबणार नसून संघर्ष यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यानंतर आता रायगड ते सातारा असा तिसरा टप्पाही लवकरच सुरु करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला अभिवादन करुन तिसऱ्या टप्प्यातील संघर्षयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग-कोल्हापूर-सांगली- सातारा असा या संघर्षयात्रेचा मार्ग असणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी, शेकापचे नेते प्रवीण गायकवाड, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खा.सुरेश टावरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ.सुनील केदार, आ.राजेश टोपे, आ.पांडुरंग बरोरा, आ. सुमनताई पाटील, आ. विद्याताई चव्हाण, आ.यशोमती ठाकूर, आ.प्रदीप नाईक , आ.जयकुमार गोरे, आ. ख्वाजा बेग, आ.प्रकाश गजभिये, आ.हणमंत डोळस,आ.संदीप नाईक,आ.निरंजन डावखरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,माजी आ. गोटीराम पवार आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com