...तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाही - अजित पवार

...तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाही - अजित पवार

नाशिक : डोक्‍यावरील कर्जाच्या ओझ्याखाली राज्यातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु अद्यापही हे सरकार शेतकरी आत्महत्यांकडे गांभीर्याने पहायला तयार नाही. अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट पाहत आहे ? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांनी मालेगावमध्ये संघर्षयात्रेदरम्यान सरकारला केला. 

दरम्यान मालेगाव तालुक्‍यातील वाके गावातील तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच श्री. यांच्यासह संघर्षयात्रेत सहभागी नेत्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. संघर्षयात्रेदरम्यान नाशिक जिल्ह्यातील नामपूर व सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलाही त्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पवार म्हणाले राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. आज राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलाय, कर्जाच्या जाचाला कंटाळून तरुण शेतकरी आत्महत्या करत आहेत यांच्यापेक्षा दुसरी दुःखद गोष्ट असू शकत नाही. नाशिक जिल्ह्यात कांद्याला आज भाव नाही. अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला प्रती किलो फक्त 1 रुपये अनुदान दिले जाते ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. 
सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे आणि त्यांनी पिकविलेल्या कृषीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा परत आमचा शेतकरी सरकारकडे कर्जमाफी मागणार नाही. एकीकडे उद्योगपतींचे करोडो रुपयांचे कर्ज माफ केले जाते पण सरकार शेतकऱ्यांची दखल घेत नाही. हे सरकार राज्यातील सहकार क्षेत्र, बाजार समित्या मोडीत काढण्यास निघाले आहे. सत्तेच्या जोरावर आपले बगलबच्चे प्रशासक म्हणून बाजार समित्यांवर नेमले जात आहेत, पण यांचा हा डाव उलथून टाकायला हवा. सरकार विरोधातील या लढ्याला एकमताने पाठिंबा द्या. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण म्हणाले, सरकारने नुकतीच जिल्हा बॅंकांकडून 1 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविल्याची माहिती माध्यमातून येत आहे. परंतु केवळ 1 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन भागणार नाही तर राज्यातील सरसकट शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ झाले पाहिजे. परंतु सरकार केवळ 1 लाखांपर्यंतचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी श्री. चव्हाण यांनी केला. 
या संघर्षयात्रेत पवार, चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, शेकापचे नेते प्रवीण गायकवाड, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अब्दुल सत्तार, सुनील केदार, सुमन पाटील, दीपिका चव्हाण, विद्याताई चव्हाण, यशोमती ठाकूर, प्रदीप नाईक , जयकुमार गोरे, ख्वाजा बेग, प्रकाश गजभिये, हणमंत डोळस हे सर्व आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com