राजू शेट्टींकडून आंदोलनाचा खेळखंडोबा : अजित नरदे यांचा आरोप

राजू शेट्टींकडून आंदोलनाचा खेळखंडोबा : अजित नरदे यांचा आरोप

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ऊसदर आंदोलनाचा खेळखंडोबा केला आहे. आंदोलनाला शेतकऱ्यांचाच विरोध असल्याने सोमवारी आंदोलन मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांमधील तडजोडीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कारखान्यांनी एफआरपीमधील 80 टक्के रक्कम अदा करावेत, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे अजित नरदे यांनी पत्रकार बैठकीत केली.
 
नरदे म्हणाले, "एकरकमी एफआरपीसाठी मुदत देऊन कारखान्यांचेच हित जपले आहे. एकरकमी एफआरपीसाठी साखर देण्याची कल्पनाही अव्ययहार्य आहे. यातून शेतकरी आणि कारखानदार दोघांचेही नुकसान होणार आहे. या मागणीला आमच्यासह शेतकऱ्यांचा विरोध आहे. 80 टक्के रोख व 20 टक्के नंतर हे सूत्र मान्य असणाऱ्या शेतकऱ्यांकडून लेखी अर्ज घेऊन त्यांचे पैसे बॅंकेत जमा करावेत. तसे झाल्यास 99 टक्के शेतकरी 80 टक्के रक्कम स्विकारतील, असा आमचा विश्‍वास आहे. केवळ निवडणूक डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. 

यावर्षी 20 ऑक्टोबर2018 ऐवजी 10 नोव्हेंबरपर्यंत गाळप हंगाम सुरु करण्यास विलंब झाला. ऊसक्षेत्र अधिक असल्याने हंगाम वेळेत सुरु होणे गरजेचे होते. पण संघटनेच्या हटवादी धोरणामुळे 20 दिवस गाळप लांबले. सद्यस्थितीत कारखाने बंद करणे आत्मघातकी आहे. तरीही निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे पाऊल उचलले. याला आमचा आधीपासून विरोध होता. शेतकऱ्यांची साथ मिळत नसल्याने आंदोलन मागे घेतले याचे आम्ही स्वागत करतो. आंदोलनामुळे तब्बल 25 दिवस वाया गेल्याने स्वाभिमानीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे हे वास्तव आहे. कारखान्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांचा तोटा असे कार्य संघटनेचे सुरु आहे.

पत्रकार बैठकीस संजय कोले, शीतल राजोबा, वसंतराव पिसे, मोहन परमने, श्रेणिक नरदे उपस्थित होते. 

तडजोडीला विरोध 

ऊस तुटून 70 दिवस झाले. खोडव्याची भरणी, लागवड, भांगलण, पाणीपट्टी, बॅंक, सोसायटीचे कर्ज भागवायचे आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. तेंव्हा त्यांना 80 टक्के रक्कम स्विकारण्याचे स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी करुन ते म्हणाले, "ऊस बिलाऐवजी साखरेच्या मागणीलाही आमचा विरोध आहे. कारखानदारांच्या अवैध संपत्तीची माहिती प्राप्तिकर खात्याला देण्याची धमकी देणाऱ्या खासदार शेट्टी यांनी केलेल्या तडजोडीला आमचा विरोध आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com