Aishwarya is materialist & I am spiritual : Tejpratap Yadav | Sarkarnama

ऐश्‍वर्या चैनी मनोवृत्तीची, तर मी आध्यात्मिक मनोवृत्तीचा : तेजप्रताप यादव 

उज्ज्वलकुमार 
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

ऐश्‍वर्यासारख्या आधुनिक मुलीबरोबर संसार करणे अशक्‍य आहे .  ऐश्‍वर्या चैनी मनोवृत्तीची, तर मी आध्यात्मिक मनोवृत्तीचा  आहे.

- तेजप्रताप यादव

पाटणा :  मुलगा तेजप्रताप याच्या वागणुकीमुळे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हैराण झाले आहेत. लालूंचे कुटुंबीय चिंतेत असले तरी, खुद्द तेजप्रताप मात्र निवांत असल्याचे दिसते. तुरुंगात असले तरी, लालूप्रसाद यांना मुलाच्या वर्तनाची माहिती मिळते; पण ते काही करू शकत नाहीत.

पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणापासून लालूप्रसाद यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा लागला असून, त्यात आता 'आयआरसीटीसी'ला हॉटेल देण्याच्या बदल्यात जमीन घेण्याच्या प्रकरणाची भर पडली आहे. या सगळ्यांना तोंड देताना दमछाक होत असताना तेजप्रतापने नवे संकट आणले आहे. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्याने पत्नी ऐश्‍वर्यापासून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्याचे कुटुंब सुनेच्या बाजूने आहेत. 

घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यावर तेजप्रतापने लालूप्रसाद यांची तुरुंगात भेट घेतली. वडील माझे काही ऐकत नाहीत; पण मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे त्याने नंतर सांगितले. विवाहानंतर ऐश्‍वर्याने मी आणि माझा भाऊ तेजस्वी यांच्यात भांडणे लावल्याचा आरोप तेजप्रतापने केला आहे. ऐश्‍वर्यासारख्या आधुनिक मुलीबरोबर संसार करणे अशक्‍य असल्याचेही सांगतानाच, ऐश्‍वर्या चैनी मनोवृत्तीची, तर मी आध्यात्मिक मनोवृत्तीचा असल्याचा दावाही त्याने केला आहे.

रांचीत लालूप्रसाद यांना भेटल्यावर तेजप्रताप बोधगयेत मुक्कामाला गेले होते. प्रकृती चांगली नसल्यामुळे मुक्काम केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. मात्र, सोमवारी ते खोलीतच नसल्याचे पाहुन सुरक्षा कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. नंतर, दोन रक्षकांसमवेत तेजप्रताप बनारसला गेल्याचे समजले. तेथे त्यांनी बाबा विश्‍वनाथाचे दर्शन घेतले. आता तेजप्रताप वृंदावनला जाणार असल्याचे कळते.
 

संबंधित लेख