Ahmednagar Water News | Sarkarnama

बड्या शेतकऱ्याच्या तळ्यात विसापूरचे पाणी : जिल्हाधिकारी कार्यालयाचे जलसंपदा अधिकाऱ्यांवर दडपण?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

अधिकारी शेतकऱ्यांना पाणी देताना नियम लावतात; मात्र बड्यांसाठी अर्थकारण पाहून पाणी विकले जाते. याही आवर्तनात तेच घडले असून, जलसंपदा अधिकाऱ्यांनी तडजोड करून नियमबाह्य पद्धतीने पाणी विकण्याचा सपाटा लावला आहे. नियमात पाणी दिले, तर काहीच हरकत नाही; मात्र वेगळ्या पद्धतीने हे सुरू असल्याने त्याविरोधात आंदोलन तर करणार आहोत - राजेंद्र काकडे, शेतकरी बचाव कृती समिती

श्रीगोंदे : विसापूरचे आवर्तन सोडताना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेततळ्यांना पाणी न देण्याचे पक्के धोरण ठरले असताना लाभक्षेत्रातील एका बड्या शेतकऱ्याला मात्र यातून सूट देऊन जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत शेततळे भरले जात असल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला आहे. प्रभारी उपअभियंता दिलीप साठे यांनीही त्यास दुजोरा देताना जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्यावर त्याबाबत दडपण असल्याचा खुलासा केला.

विसापूर मध्यम प्रकल्पातून सोडलेल्या आवर्तनात केवळ शेतातील उभ्या पिकांना वितरिकेतून पाणी देण्याचा निर्णय झाला होता. प्रभारी उपअभियंता साठे यांनी शेततळी भरली, तर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. मात्र, हा नियम सामान्य शेतकऱ्यांपुरताच असल्याचे आता पुढे आले आहे. एक बडा शेतकरी त्याचे शेततळे जनरेटर लावून बिनधास्त भरीत आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी तक्रार केली, तरी साठे यांनी कुणाचेही ऐकले नाही.

शेतकरी बचाव कृति समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे म्हणाले, ''अधिकारी शेतकऱ्यांना पाणी देताना नियम लावतात; मात्र बड्यांसाठी अर्थकारण पाहून पाणी विकले जाते. याही आवर्तनात तेच घडले असून, जलसंपदा अधिकाऱ्यांनी तडजोड करून नियमबाह्य पद्धतीने पाणी विकण्याचा सपाटा लावला आहे. नियमात पाणी दिले, तर काहीच हरकत नाही; मात्र वेगळ्या पद्धतीने हे सुरू असल्याने त्याविरोधात आंदोलन तर करणार आहोतच; शिवाय न्यायालयातही धाव घेऊ.''

साठे यांना विचारले असता ते म्हणाले, ''शेततळ्यांना पाणी न देण्याचे ठरले होते; मात्र त्या शेतकऱ्यांना उचल पाणी देऊन त्यांचे शेततळे भरण्याचा आदेश आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून आला आहे.'' त्या शेतकऱ्याने पाण्याची मागणी केली आहे; मात्र त्याला उचल पाण्याची परवानगी दिलेली नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असला, तरी आम्ही त्याचे पाणी बंद करू शकत नाही. कारण वरिष्ठांचे तसे आदेश असल्याचे सांगत साठे यांनी या बड्या शेतकऱ्याची पोच लांबवर असल्याचे अप्रत्यक्षरीत्या कबूल केले.

संबंधित लेख