जानकरांनी एका दुधवाल्याला महामंडळाचा अध्यक्ष बनवलं! 

अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.
जानकरांनी एका दुधवाल्याला महामंडळाचा अध्यक्ष बनवलं! 

पुणे : "मी माझ्या चतुरवाडी गावात दूध गोळा करत होतो. महाविद्यालयात शिकत असताना १९९७ साली महादेव जानकर यांचं भाषण ऐकलं आणि त्यांच्या प्रेमात पडलो. त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. तेव्हा गावात यशवंत सेना स्थापन केली. तेव्हापासून आजअखेर महादेव जानकर यांच्यासोबत राहिलो. आज जानकर साहेबांनी एका दुधवाल्याला महामंडळाचा अध्यक्ष बनवलं आहे. त्यांच्यामुळं माझ्या आयुष्याचं सोनं झालंच पण चतुरवाडी या एका खेडयातील कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो हेही सिद्ध झालं आहे," अशी प्रतिक्रिया अहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. 

दोडतले १९९७ साली बीएस्सीत शिकत असताना महादेव जानकर यांच्या संपर्कात आले. तेव्हा राज्यभर जानकर यांनी स्थापन केलेल्या यशवंत सेनेचा झंजावात होता. त्यांचे भाषण ऐकून दोडतले यांनी त्यांच्या यशवंत सेनेत काम करण्याचा निर्णय घेतला. गावात आणि परिसरात शाखा सुरु केल्या. यशवंतसेनेचे मुखपत्र यशवंत नायक यांचे सभासद वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २००३ साली जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केल्यावर मराठवाडा संपर्कप्रमुख आणि सध्या महाराष्ट्र महासचिव म्हणून ते कार्यरत आहेत. दोडतले यांनी २००४ साली प्रकाशराव सोळुंखे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्या विरोधात रासपच्या वतीने बीड लोकसभा निवडणूक लढवली होती. 
२०१२ साली मोरेवाडी जिल्हा परिषद गटातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. या विजयाने ते राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिले  जिल्हा परिषद सदस्य ठरले. 

दोडतले म्हणाले ,"महादेव जानकर यांचा त्याग पाहूनच मी त्यांचा कार्यकर्ता झालो. त्यांनी समाजासाठी घर सोडलं ते पुन्हा कधीही घरी गेले नाहीत. त्यांच्या घरातील लोकांनासुद्धा ते कोठे आहेत, हे माहिती नव्हतं. त्यांच्यावर खूप प्रेम करणारे एक चुलते होते. त्यांचे निधन झाल्याचेही साहेबांना बरेच दिवस माहिती झाले नव्हते कारण तेव्हा संपर्काची साधने नव्हती. कुटुंबाचा त्याग केलेल्या या माणसाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अफाट प्रेम केले आहे. त्यांचा त्याग आम्हाला नेहमी भावतो, आज तर त्यांच्यामुळे एक दूधवाला महामंडळाचा अध्यक्ष झाला आहे."

निवड झाल्यावर माझे वडील प्रभाकर दोडतले यांना सांगितल्यावर ते आनंदाने गहिवरले. माझ्या गावातही लोकांनी आनंद साजरा केला. माझे वडील साखर कारखान्यात कामगार होते. एका साखर कामगाराच्या पोराला आज संधी मिळाली आहे. - - बाळासाहेब दोडतले  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com