agitation against laxman mane in kolhapur | Sarkarnama

सासरवाडीत लक्ष्मण मानेंच्या दिशेने बांगड्या फेकल्या!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 डिसेंबर 2018

कोल्हापूर ही लक्ष्मण मानेंची सासरवाडी आहे.

कोल्हापूर : पाटलांच्या मुलींना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करणारे 'उपरा'कार लक्ष्मण माने थांबलेल्या शासकीय विश्रामधामच्या इमारतीवर आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या फेकल्या. तसेच, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शाहूपुरी पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली. 

पुण्यात झालेल्या ओबीसी आरक्षण जागरण परिषदेत माने यांनी पाटलांच्या मुलींना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सोशल मीडियातून समाजाची माफी मागितली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा मेळावा येत्या आठवड्यात सांगलीत होत आहे. त्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी ते आज कोल्हापुरात आले होते. ते शासकीय विश्रामधाम येथे आल्याचे समजताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सचिन तोडकर यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्ते तेथे जमा झाले. त्यांनी माने यांच्या निषेधाच्या घोषणा देत माफीची मागणी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. 
याच वेळी कार्यकर्त्यांनी इमारतीच्या दिशेने बांगड्या भिरकावत निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. 

माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांचा रोष स्वाभाविक आहे. आपल्याला कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. प्रत्येक समाजाबद्दल मला आदर आहे. या प्रकाराबद्दल मी याआधी माफी मागितली आहे, तरीही पुन्हा एकदा मी सर्वांची जाहीर माफी मागतो. 
- लक्ष्मण माने 

संबंधित लेख