अमित शहांविरोधातील याचिका फेटाळून लावावी 

अमित शहांविरोधातील याचिका फेटाळून लावावी 

मुंबई : बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निर्दोष सोडण्याच्या सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान का दिले नाही, अशी विचारणा करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ही याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी केली असून फेटाळून लावावी, अशी विनंती सीबीआयने न्यायालयाला केली. 

सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) विरोधातील या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने 3 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब केली. सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी अमित शहा यांना दोषमुक्त करण्याचा निर्णय योग्यच होता, असा दावा करीत सीबीआयने मंगळवारी या याचिकेच्या वैधतेवर आक्षेप घेतला. मुंबईतील वकिलांची एक संघटना "बॉम्बे लॉयर्स असोसिएशन'ने ही याचिका केली आहे. 

सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे निर्देश सीबीआयला द्या, अशी विनंती या जनहित याचिकेत केली आहे. याप्रकरणी सीबीआय जाणूनबुजून उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करत नसल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. अहमद आब्दी यांनी केला. 

याच प्रकरणातील इतर दोषमुक्त आरोपींविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात अपील केले; परंतु अमित शहा यांच्यासंदर्भातील निर्णयाला आव्हान दिले नाही. सीबीआयची ही भूमिका संशयास्पद असल्याचे याचिकेत म्हटले आहे. न्या. रणजित मोरे व न्या. भारती डोंगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. 

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी याचिकेच्या गुणवत्तेवर आक्षेप घेत, सोहराबुद्दीनच्या भावाने या संदर्भात केलेली याचिका न्यायालयाने यापूर्वीच फेटाळल्याची माहिती दिली. राजेश कांबळे यांनीही अशी याचिका केली होती; मात्र त्यांच्या सहभागावर (लोकस स्टॅन्डा) प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत ही याचिकाही न्यायालयाने फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयानेही अपील याचिका फेटाळली असून, एक क्‍युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. 

प्रतिज्ञापत्राचा मुद्दा 
ही याचिका दाखल करून घेण्यायोग्य नसल्याने उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रश्‍नच नसल्याचा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी केला. याचिकाकर्त्यांनी जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत असे प्रतिज्ञापत्र सादर करणे प्रतिवाद्यांना बंधनकारक असल्याचा युक्तिवाद केला. तो न्यायालयाने मान्य केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com