after criticizing bjp sanjay kakade meets ajitdada | Sarkarnama

भाजपने वापर केल्याचा आरोप करत संजय काकडेंनी घेतली अजितदादांची भेट

उमेश घोंगडे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे भाजपमधील काही सोंगाड्यांमुळे आपण पक्षापासून दुरावल्याची टीका राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केली. हे सोंगाडे कोण, याचा आता प्रश्न निर्माण झाला आहे. 

पुणे : पुणे भाजपने माझा वापर केल्याचा आरोप करत भाजपचे सहयोगी सदस्य असलेले राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत मदत मागण्यासाठीच गेल्याचेही काकडे यांनी स्पष्टपणे सांगितले आणि अजितदादांनीही काकडेंना मदतीचा शब्द दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला भावासारखे आहेत. पण भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावेच लागते, अशा शब्दांत काकडे यांनी उद्वेग व्यक्त केला. काकडे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपने इतर नेत्यांचीच नावे चर्चेत आणल्याने काकडेंनी थेट आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आज पुण्यात अजित पवार यांची भेट घेऊन आपली मोर्चेबांधणी केली.

काॅंग्रेसचा जो कोणी उमेदवार असेल त्याला राष्ट्रवादी काॅंग्रेस मनापासून मदत करेल, असे अजित पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. काकडे भाजपवर नाराज असल्याने तुमची भेट झाली का, या प्रश्नावर काकडेंनी माझ्याशी बोलताना तसे सांगितलेले नाही. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याची माझी माहिती नाही. ते भाजपचे केवळ सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे खासदार नसल्याने ते कोणालाही भेटू शकतात.

या भेटीनंतर बोलताना काकडे यांनी काही सोंगाड्यांमुळे भाजपमध्ये कोंडी झाल्याचे सांगितले. भाजप आता खासदारकीसाठी कोणतीही नावे पुढे आणत आहेत. जे स्वतःच्या बळावर नगरसेवक होऊ शकत नाहीत. त्यांना खासदारकीचे स्वप्न पडत असल्याचा टोमणा मारला. फडवणीस यांच्याविषयी माझ्या भावना अजून चांगल्या आहेत. ते मला भावासारखे आहेत. स्थानिक भाजपने मात्र माझा वापर करून घेतला, असा आरोप त्यांनी केला.

फडणविसांशी तुमचे संबंध चांगले आहेत तर तुम्ही अजितदादांना का भेटताय, या प्रश्नावर काकडे म्हणाले की भावाने लाथ मारल्यावर दुसरे घर शोधावेच लागते, असा युक्तिवाद त्यांनी केला.  अजितदादा हे साधे आमदार होते तेव्हा मी छोटा बिल्डर होतो तेव्हापासून आमचे संबंध आहेत. ते माझ्यावर नाराज असल्याचे या भेटीत दिसून आले नसल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख