Adway Hire attacks Subhash Bhamre | Sarkarnama

भामरेंचे खासदारकीचे तिकीट रद्द करण्यासाठी  त्यांचे सख्खे बंधू सुरेश पाटील गडकरींच्या घरी बसले होते : अव्दय हिरे

निखिल सूर्यवंशी
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आमदार अनिल गोटे हे सक्षम नेतृत्व आहे, त्यामुळे गोटेंच्या सहमतीशिवाय भाजपने तिकीट वाटप करू नये, अशी माझी भूमिका आहे.

-अद्वय हिरे

धुळे : " संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंचा भाजपमध्ये प्रवेश कधी झाला, त्यांचा अजूनही अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश नाही, असे म्हणत प्रत्येकच मतदारसंघात स्वतःचा गट तयार करायचा व तेथील निवडणुकांमध्ये पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा.

सहाही मतदारसंघात मी एकटाच नेता, अशी भूमिका डॉ. भामरेंनी तयार करायला सुरवात केली आहे" , अशी टीका  नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी येथे केली.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आमदार अनिल गोटे हे सक्षम नेतृत्व आहे, त्यामुळे गोटेंच्या सहमतीशिवाय भाजपने तिकीट वाटप करू नये, अशी माझी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीतील भाजपमधील कलहाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार गोटेंच्या समर्थनार्थ श्री. हिरे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ निकम, मालेगाव तालुका संघांचे माजी अध्यक्ष शांताराम लाठर, व्यंकटेश बॅंकेचे सभापती अशोक बच्छाव आदी उपस्थित होते.

" मुळात डॉ. भामरेंचे खासदारकीचे तिकीट रद्द करा, हे सांगण्यासाठी त्यांचे सख्खे बंधू सुरेश पाटील गडकरींच्या घरी बसले होते. अनिल गोटे कुठल्याही परिस्थिती डॉ. भामरेंना घरात येऊ द्यायला तयार नव्हते. त्या निवडणुकीत आम्ही सक्रिय भूमिका पार पाडली नसती आणि जे अन्याय पक्षाच्या माध्यमातून आमच्यावर झाले, त्याचा रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित डॉ. भामरेंना खासदार होणं सुद्धा शक्‍य झालं नसतं.  हे डॉ. भामरेंनी प्रामाणिकपणाने समजून घेतले पाहिजे. याआधी आपल्याला नगरपालिकेत, विधानसभेत किती मते मिळाली आहेत, कितीवेळी आपण निवडून आलो आहोत, याचे निश्‍चितपणे डॉ. भामरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे", असे हिरे म्हणाले.
 

संबंधित लेख