Adv. Pratap Dhakne may get Loksabha Candidature | Sarkarnama

लोकसभेसाठी अॅड. प्रताप ढाकणे यांच्या गटाच्या आशा फुलल्या

मुरलीधर कराळे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नुकतेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच लढविणार, हे ठासून सांगितले. त्यामुळे ही जागा काँग्रेसला म्हणजेच काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांना सोडणार, ही शक्यता मावळली आहे. फाळके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी इच्छुक नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोडले, त्यामुळे राष्ट्रवादीकडून घुले यांची उमेदवारी पक्की असल्याचे मानले जाते. त्यामुळे पक्षाचे प्रदेशसरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांचा विधानसभेसाठीचा पत्ता कट झाल्याचे समजते. साहजिकच अॅड. ढाकणे यांची उमेदवारी लोकसभेसाठी निश्चित होईल, अशी आशा ढाकणे यांच्या गटाला लागली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नुकतेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच लढविणार, हे ठासून सांगितले. त्यामुळे ही जागा काँग्रेसला म्हणजेच काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांना सोडणार, ही शक्यता मावळली आहे. फाळके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे लोकसभेसाठी इच्छुक नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

राष्ट्रवादीच्या या जागेसाठी इच्छुकांमध्ये असलेल्या काही नेत्यांना पक्षाने आधीच राज्यपातळीवरील पदे बहाल केली आहेत. त्यामुळे त्यांचाही पत्ता लोकसभेच्या शर्यतीतून कट केल्याचे मानले जाते. माजी आमदार पांडुरंग अभंग यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांना विधानसभेच्या उमेदवारीपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे चंद्रशेखर घुले यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी होईल, या शक्यतेलाही पूर्णविराम मिळाला आहे. क्रांतिकारी पक्षाचे नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. गडाख यांचे पूत्र प्रशांत गडाख यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र प्रशांत यांच्या गोटातून सध्यातरी शांतता आहे. त्यामुळे ही उमेदवारी होणार नसल्याचे बोलले जाते.

उत्तरेचे अतिक्रमण नकोच
काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत डाॅ. सुजय विखे यांना नगर दक्षिण मतदारसंघाची जागा सोडण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले, पण राष्ट्रवादीच्या दक्षिणेतील नेत्यांकडून याला हिरवा कंदिल मिळालच नाही. कोणत्याही परिस्थितीत उत्तरेतील उमेदवार स्विकारायचा नाही, असा चंगच दक्षिणेतील नेत्यांनी बांधला असल्याचे समजते. प्रशांत गडाख यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्याचे ठरविल्यास उत्तरेचे हेही अतिक्रमण स्विकारायचे नाही, असा चंग दक्षिणेतील नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळे अॅड. ढाकणे यांचेच नाव आता लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुढे येऊ लागले आहे.

संबंधित लेख