adv mukteshwar dhondge meet pankaja and jankar | Sarkarnama

चिखलीकरांमुळे ऍड. धोंडगे अस्वस्थ; पंकजा- जानकरांशी खलबते! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

ऍड. मुक्‍तेश्‍वर धोंडगे हे भाजपअंतर्गत पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मानतात. त्यामुळे धोंडगे यांची राजकीय सोय पंकजांना पाहावी लागणार आहे. चिखलीकर भाजपमध्ये आले आणि निवडणूक लागलीतर ऍड. धोंडगे विरोधात असणार आहेत. त्यावेळी पंकजा, तसेच जानकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आगामी निवडणुकीत रासपची युती कोणासोबत असेल, हा विषय दूरचा असलातरी प्रसंगी धोंडगे रासपचे उमेदवार होऊ शकतात. त्यामुळे पंकजा व जानकर भेटीची मोठी चर्चा लोहा मतदारसंघात आहे. 
 

पुणे : नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी आपले बहुतेक समर्थक भाजपमध्ये पाठवून दिले आहेत. त्यांचा प्रवेश ही फक्‍त औपचारिका बाकी राहिली असल्याने, लोह्यातील स्थानिक भाजप नेते ऍड. मुक्‍तेश्‍वर धोंडगे अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी मुंबईत जावून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याशी खलबते केली आहेत. 

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार केशवराव धोंडगे यांचे मुक्‍तेश्‍वर हे पुत्र आहेत. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुक्‍तेश्‍वर यांनी कमळ हाती घेतले होते. विधानसभेला त्यांना भाजपचे तिकीट मिळाले. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोह्यात सभा घेतली होती. मात्र धोंडगेंना विजय मिळाला नाही. शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर मोठ्या फरकाने विजयी झाले. चिखलीकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक असल्याने पक्षनेतृत्वाकडून ताकद मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. शिवसेनेकडून मंत्रीपद मिळेल या अपेक्षेत चिखलीकर होते, मात्र त्यांना ताकद मिळाली नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपच्या संपर्कात होते. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात, चिखलीकरांनी मेहुणे श्‍यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून अशोकरावांना जोरदार आव्हान त्यांनी दिले होते. ही लढत काट्याची झाली, मात्र शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी चिखलीकरांचे नियोजन यशस्वी होऊ दिले नाही. त्यावेळपासून शिवसेनेशी त्यांचा फारच दुरावा वाढला. 

चिखलीकर कॉंग्रेसमध्ये असताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांचे गॉडफादर होते. ते सद्या नांदेड जिल्ह्यात अशोकरावांनंतरचे दुसरे प्रभावी राजकारणी आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंकडून ताकद मिळणे अपेक्षित होते, मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे चिखलीकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात गेले. या मतदारसंघात भाजपला स्व:चा उमेदवार भविष्यातही निवडून आणणे अवघड वाटत असल्याने त्यांनी चिखलीकरांना ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड पालिका जिंकून घेण्याची महत्त्वपुर्ण जबाबदारी चिखलीकरांवर भाजपने सोपवली आहे. त्यासाठी चिखलीकरांना मंत्री करण्याचा शब्द देण्यात आला आहे. त्यांनी शिवसेना राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा, या तांत्रिक बाबींत हा विषय आहे. चिखलीकर मात्र पुर्णपणे मनाने भाजपवासी झाले आहेत. त्यांनी नांदेड महापालिकेतील काही नगरसेवकांना राजीनामे द्यायला लावून त्यांचा भाजपप्रवेश करवून घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रवेशावेळी चिखलीकर भाजप कार्यालयात होते. एकूणच त्यांचा प्रवेश ही फक्‍त औपचारिकता राहिली आहे. 

चिखलीकरांच्या संभाव्य प्रवेशामुळे ऍड. मुक्‍तेश्‍वर धोंडगे अस्वस्थ झाले आहेत. ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. 2014 ला धोंडगे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. आता भाजपसाठी चांगले वातावरण असल्याने 2019 ला निवडून येऊ, या भूमिकेतून कार्यरत होते. मात्र चिखलीकरांमुळे मुख्य प्रवाहातून बाजूला पडण्याची वेळ येऊ नये, म्हणून धोंडगे कामाला लागले आहेत. त्यांनी नुकताच समर्थकांचा मेळावा घेऊन आगामी वाटचालीचे संकेत दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत राजकीय संघर्ष चालूच राहणार, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणावरुन त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. निर्णय न घेतल्यास पक्ष सोडणार असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरच त्यांनी नव्या पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. नांदेडचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. तसेच स्थानिक सामाजिक समीकरणे पाहता धोंडगेंनी राष्ट्रीय समाज पक्षातून लढावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन धोंडगे मंगळवारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी रॉयलस्टोन या निवास्थानी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हेही उपस्थित होते. धोंडगे व जानकर यांची स्वतंत्रपणेही चर्चा झाली. 

 

संबंधित लेख