aditya will look after mumbai | Sarkarnama

आदित्य मुंबई सांभाळणार; उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरणार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमोल्लंघन करत राज्यभर दौरे सुरू केले आहेत. त्यांचे हे दौरे सुरू असताना मुंबईवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत यापुढे आदित्य यांचे कार्यक्रम सुरू होतील. 

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेच्या अनेक प्रकल्पांना सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. या प्रकल्पाचा पाठपुरावा घेण्यासाठी त्यांच्या उद्‌घाटनाला आणि भूमिपूजनाला हजेरी लावण्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. यापुढे ते संपूर्ण लक्ष राज्यावर केंद्रित करणार आहेत. राज्यात दौरे करून उमेदवार निवडीसाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी ते झटणार आहेत.

उद्धव ठाकरे राज्यात फिरत असताना मुंबईत दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबई, ठाणे हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरारा आहे. त्यांचे पक्षातील वाढलेले वजन पाहता त्यांच्यावरच संपूर्ण भार सोपवण्यात आले आहे; मात्र मुंबईवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्यावर सोपवली आहे.

पालिकेशी संबंधित असलेल्या कामांवर खासकरून आदित्य लक्ष ठेवत आहेत. पाच वर्षांपूर्वी लहान-मोठे उद्यान, मैदानांच्या कार्यक्रमालाही उद्धव हजेरी लावत होते; मात्र आता ती जबाबदारी आदित्य यांच्यावर राहील. उद्धव ठराविक महिन्यांनी मुंबईतील कामांचा आढावा घेतील. कोस्टल रोड, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामकाजावर स्वत: उद्धव लक्ष ठेवणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे.

उद्धव यांच्या दौऱ्याची सुरवात काल शिर्डी आणि नगर या लोकसभा मतदारसंघापासून झाली. पुणे जिल्ह्यात २२ आॅक्टोबरला सभा झाल्यानंतर ते बीडमध्ये सभा घेणार आहेत.

 

संबंधित लेख